महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अकॅडमी ऑफ महाराष्ट्र रिसर्च अपलिफ्टमेंट अँड ट्रेनिंग – अमृत) च्या वतीने आयोजित माहितीविषयक नाशिक जिल्हा महामेळावा दि. १८ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ५ ते ७ या वेळेत अखिल मध्यवर्ती ब्राह्मण संस्था येथे अमृतचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी व लक्षित गटातील समाज बांधवांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला.
दीपप्रज्वलन व भारतमातेचे प्रतिमापूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. पुढे राज्यगीताने कार्यक्रमात देशभक्तीच्या रंगाची उधळण उपस्थितांच्या मनात झाली. अमृतचे नाशिक विभागाचे विभागीय व्यवस्थापक मंगेश खाडिलकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडताना व्यवस्थापकीय संचालकाचा मोजक्या शब्दात परंतु व्यापक परिचय उपस्थितांना करून दिला. “अमृतसाठी झोकून अविरत कार्यरत असणारे व्यक्तिमत्व म्हणजे विजय जोशी होय” असेही त्यांनी याप्रसंगी म्हटले.
मुख्यमंत्री शैक्षणिक फंडमधून आयर्लंड या देशात विशेष शिक्षण घेऊन एम. एस. करीत असलेल्या ईशा बोरगांवकर हिचा विशेष सत्कार या मेळाव्याच्या प्रसंगी करण्यात आला. तसेच मेळाव्यास मोलाचे सहकार्य करणारे आय. एम. सी. पदाधिकारी गौरव बडवे यांचा देखील सत्कार विजय जोशी यांच्या हस्ते करण्यात आला.
सोलर प्रशिक्षण या योजनेचे लाभार्थी रुपेश जोशी व मानसी वाळिंबे यांनी त्यांचा अमृतविषयीचा अनुभव अत्यंत प्रेरणादायक रीतीने स्पष्ट केला. मानसी वाळिंबे म्हणाल्या की ठरविल्यास एक महिला देखील असे तांत्रिक कोर्स अगदी निःसंकोचपणे नक्कीच करू शकते” तसेच व्याज परतावा योजनेचे लाभार्थी चैतन्य देवगावकर हे अनुपस्थित असून देखील त्यांच्या वडिलांनी त्यांचा अनुभव श्रोत्यांना पत्राच्या माध्यमातून सांगितला.
अखिल मध्यवर्ती ब्राह्मण संस्थेचे पदाधिकारी, रुपेश जोशी व नाशिक जिल्हा अमृत टीमने विजय जोशी यांचा आदरपूर्वक सत्कार केला.
विजय जोशी यांनी मनोगत व्यक्त करतांना “जिसका कोई नहीं उसका अमृत हैं” असे म्हणून लक्षित गटातील समाज बांधवांना विविध क्षेत्रात विशेषतः उद्योजक म्हणून सक्रिय होण्याकरिता आवाहन केले. लक्षित गटातील प्रत्येक समाजाने ठरविल्यास आपणही सर्व क्षेत्रात आपण सक्रिय होऊ शकतो असेही ते म्हणाले.
प्रश्नोत्तरांच्या सत्रात विचारलेल्या प्रत्येक प्रश्नांची विजय जोशी यांनी समर्पक उत्तरे दिली व उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले. ‘दुर्गोत्सव २०२५’ या शासनाच्या विशेष उपक्रमात दीपावलीत जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता प्राप्त असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांपैकी कोणत्याही एका किल्ल्याची प्रतिकृती तयार करून त्यासोबत आपला एक सेल्फी अमृतच्या वेबसाईट वर अपलोड करावा. हुबेहूब किल्ला तयार करणाऱ्या
प्रत्येकास मा. मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी असलेले प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल अशी माहिती दिली.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात अमृतचे नाशिक जिल्हा व्यवस्थापक संजय गोसावी यांनी आभार प्रदर्शन करत कार्यक्रमाचा समारोप केला. मनिषा बोरगांवकर यांनी कार्यक्रमाच्या सूत्रसंचलनाची धुरा सांभाळली. मेळाव्यास मंगेश खाडिलकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.



