
आज १९ नोव्हेंबर अर्थात वीरांगना राणी लक्ष्मीबाई यांचा जन्मदिवस. राणी लक्ष्मीबाई म्हणजे तेज, शौर्य, पराक्रम, दृढनिश्चय यांचे मूर्तिमंत उदाहरण. १८५७च्या स्वातंत्र्यसंग्रामात त्यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आणि त्यांच्या शौर्याला त्रिवार वंदन…
मनकर्णिका नाव तिचे, मनू म्हणती लाडाने
अस्त्र-शस्त्र अन् तलवारी, हेच तिचे खेळणे
चपळ, धीट अन् शूरवीर ती, राणी लक्ष्मीबाई
झाशी होते राज्य तिचे, ती झिजली राज्यापायी
दत्तक पुत्रासाठी राणी, लढली गोऱ्यांशी
राज्य मिळविण्यासाठी, राणी झुंजली इंग्रजांशी
थोर पराक्रम काय वर्णू मी, काय तिचा हो जोश
जणू चमकावी वीज नभी, असा तिचा आवेश
पाठीवरती बाळ घेऊनी, हाती एक तलवार
घोड्यावरती स्वार होऊनी, करत जाई वार
लढता लढता थकली राणी, तलवार काही थांबेना
रणांगणी शौर्याने लढली, संघर्ष तिचा संपेना
वीरपुत्री ती वीरांगना ती, राणी लक्ष्मीबाई
भक्तांसाठी धावून यावी, जशी माय भवानी
– कौमुदी परांजपे, नाशिक




खूप छान..