बालहक्कांबद्दल जागरूक करणारा दिवस

खरे तर बालपण हा आपल्या आयुष्यातील सगळ्यात सुंदर टप्पा असतो. परंतु आजही काही मुलांचे बालपण तितकेसे सोपे नाही. आजही समाजात लहान मुलांच्या समस्या प्रकर्षाने दिसतात. स्त्रीभ्रूणहत्या, बालकामगार, बालविवाह इत्यादी दुष्प्रकार आजही समाजात घडताना दिसतात. त्यांना आळा घालण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने पाऊल उचलले. जात, वर्ण, लिंग, भाषा, धर्म यांचा विचार न करता जगातील प्रत्येक बालकाला सर्वांगीण विकासाचा हक्क असून, त्याला सुखी व समृद्ध जीवन जगता व्हावे, या हेतूने संयुक्त राष्ट्रसंघाने २० नोव्हेंबर १९८९ रोजी बालकांचे जन्मजात हक्क घोषित करणारा जाहीरनामा स्वीकारला. तेव्हापासून २० नोव्हेंबर हा जागतिक बालहक्क दिन म्हणून साजरा केला जातो.

बालहक्क म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचे तर बालहक्क म्हणजे मुलांचे मानवी हक्क आहेत. वय, वंश, लिंग, संपत्ती किंवा जन्मस्थान काहीही असले, तरी हे हक्क प्रत्येक मुलाला मिळतात. आंतरराष्ट्रीय कायद्यात बालहक्कांच्या कन्व्हेन्शनमध्ये अंतर्भूत आहेत. मुलांच्या या हक्कांबद्दल जागरूकता वाढावी आणि या हक्कांचे संरक्षण व्हावे, हाच असा दिवस साजरा करण्याचा उद्देश आहे. भारतातही हा दिवस उत्साहाने साजरा केला जातो. राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगासारख्या संस्था या दिवशी राष्ट्रीय परिषद आयोजित करतात. अन्य संस्थाही काही कार्यक्रम आयोजित करतात. उद्याचा सुजाण, सुदृढ आणि उत्तम नागरिक घडण्याच्या दृष्टीने प्रत्येक बालकाच्या या हक्कांचे संरक्षण व्हायलाच हवे!

🔗

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *