महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृतिदिन

महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृतिदिन दर वर्षी २१ नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. संयुक्त महाराष्ट्र चळवळी दरम्यान मराठी भाषिक राज्याच्या निर्मितीसाठी बलिदान केलेल्या १०७ हुतात्म्यांना मुंबईतील हुतात्मा चौकात अभिवादन केले जाते. ह्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आणि त्यासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांची थोडक्यात माहिती.

तत्कालीन राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्र राज्यात मुंबईचा समावेश करण्याचे नाकारले. या निर्णयाचा संपूर्ण महाराष्ट्रातून निषेध करण्यात आला होता. याचसाठी २१ नोव्हेंबर १९५६ रोजी कामगारांचा एक विशाल मोर्चा सरकारच्या निषेधासाठी मुंबई येथील फ्लोरा फाउंटनला पोहोचला. मोर्चा उधळून लावण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. तरीही मोर्चेकरी ऐकत नाहीत असे दिसल्यावर सरकारच्या आदेशाने पोलिसांनी गोळीबार केला. यात १०७ आंदोलकांना हौतात्म्य आले. त्यानंतरही अनेक उग्र आंदोलने झाली, मोर्चे काढले गेले, अनेक जणांना तुरुंगवासही सहन करावा लागला. अखेरीस या बलिदांनामुळे आणि मराठी माणसाच्या या आंदोलनांमुळे १ मे १९६० रोजी मुंबईसह महाराष्ट्राची निर्मिती झाली. २१ नोव्हेंबरच्या या दुख:द घटनेची आठवण म्हणून फ्लोरा फाउंटन येथे हुतात्मा स्मारकाची निर्मिती झाली. २१ नोव्हेंबर २००० पासून हा दिवस ‘महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृतिदिन’ म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी धारातीर्थी पडलेल्या या अनाम वीरांना शतश: प्रणाम..

जय महाराष्ट्र!!!
माहिती संकलन – कौमुदी परांजपे, नाशिक

🔗

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *