डॉ. रखमाबाई सावे-राऊत

रखमाबाई सावे-राऊत (२२ नोव्हेंबर १८६४ – २५ सप्टेंबर १९५५) या एक भारतीय चिकित्सक आणि स्त्रीवादी होत्या. त्या ब्रिटिश भारतातील म्हणून ओळखल्या जातात. तसेच १८८४ ते १८८८ या काळात बालवधू म्हणून त्यांच्या विवाहाशी संबंधित ऐतिहासिक खटल्यात सहभागी होण्यासाठी त्या प्रसिद्ध आहेत. या प्रकरणाने अनेक विषयांवर महत्त्वपूर्ण सार्वजनिक चर्चा घडवून आणली, ज्यामध्ये ब्रिटिश भारत आणि इंग्लंड या दोन्ही देशांतील कायदा विरुद्ध परंपरा, सामाजिक सुधारणा विरुद्ध पुराणमतवाद आणि स्त्रीवाद यांचा प्रामुख्याने समावेश होता. या घटनांचा परिणाम म्हणून शेवटी १८९१ मध्ये संमतीवयाचा कायदा लागू करण्यात आला.

हरिश्चंद्र यादवजी ह्या त्याकाळच्या ‘रायबहादूर’ आणि ‘जस्टिस ऑफ पीस’ अशी नेमणूक असलेल्या गृहस्थांची नात. ते स्वतः उत्तम इंग्रजी शिकलेले आधुनिक विचारांचे गृहस्थ होते. रखमाबाईंची आई, जयंतीबाई ही वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी विधवा झाल्यानंतर त्यांनी तिचा दुसरा विवाह करून दिला. रखमाबाई ही जयंतीबाई ह्यांची पहिल्या विवाहापासूनची मुलगी. जयंतीबाईंचे दुसरे पती डॉ. सखाराम अर्जुन राऊत हे नावाजलेले वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक होते. तसेच ते शल्यचिकित्साही शिकवत. त्याकाळी त्यांच्या ज्ञातीमध्ये विधवाविवाहाला विरोध नसला तरी बाल विधवा विवाह की प्रौढ विधवा विवाह, हा प्रश्न चांगलाच जोर धरून होता. हा विरोध पत्करून केलेले सापत्यविधवेसोबतचे लग्न हे हरिश्चंद्रजी आणि डॉ. सखाराम दोघांचेही धाडसाचे पाऊल होते.
रखमाबाईंच्या जडणघडणीत त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीचा मोठा वाटा तर आहेच, परंतु त्याचा योग्य वापर करून आपलं व्यक्तिमत्त्व घडवणं, हेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्या काळच्या रितीरिवाजाप्रमाणे वयाच्या नवव्या वर्षी लग्न झालं, तरी विसावे लागेपर्यंत त्यांच्या सासरी जाण्याचा प्रश्न उद्भवला नव्हता. ही तेव्हा सामान्य बाब खचित नसावी. कदाचित वयात आल्याआल्या त्यांना सासरी पाठवलं गेले असते तर असा – सासरी जाणे हितावह की नाही – हा विचार कितपत टोकदारपणे त्या करू शकल्या असत्या, हा एक प्रश्नच आहे. सासरी जाण्यास त्यांनी नकार दिल्यामुळे प्रसिद्ध रखमाबाई विरुद्ध दादाजी खटला झाला. त्यांच्या आईनं मुलीसोबत सुनेलादेखील इंग्रजी शिक्षण दिलं होतं. खटल्याच्या पूर्वकाळात (इ.स. १८८२-८५) शिक्षणासोबतच त्या आर्य समाजाच्या चिटणीसपदाचा कार्यभार सांभाळत. हरिश्चंद्र यादवजी आणि डॉ. सखाराम अर्जुन ह्या दोघांची समाजातील प्रतिष्ठितांत तसेच इंग्रज लोकांत उठबस होती. आपली मते स्पष्टपणे मांडल्यामुळे आणि कणखरपणामुळे रखमाबाईंनाही ह्या दोन्ही वर्तुळांत विशेष वागणूक मिळत असे. स्वतः लेडी गव्हर्नर, लेडी जस्टिस त्यांना चहा पार्टीसाठी आमंत्रणे धाडीत. त्यामुळे त्यांचे विचार आणि कहाणी इंग्रज समाजात थेट परिचयाची होती. नव्या हिंदुस्थानाच्या तरुण पिढीची प्रतिनिधी म्हणून हा युरोपियन समाज त्यांच्याकडे कौतुकाने आणि आदराने पाहत असे. इतकेच नव्हे तर इंग्लंडमध्ये शिक्षणासाठी गेल्यानंतर तिथेही रखमाबाईंना विचारवंत व अभ्यासू लोक भेटले. ॲलिस (बर्ट्रांड रसेलची प्रथम पत्नी), हेन्रिएट्टा मुल्लर, पंडिता रमाबाई, इव्हा मॅक्लेरन अशी बरीच मंडळी त्यांच्या व्यक्तीसंग्रहात होती. इंग्लंडमध्येसुद्धा त्या वेगवेगळ्या सभांमधून भाग घेत राहिल्या. ह्यावरून त्यांचा सतत कार्यरत राहण्याचा पिंड दिसून येतो.
त्या काळात परदेशातसुद्धा स्त्रियांचे वैद्यकीय शिक्षण तितके सोपे नव्हते. असं असताना रखमाबाईंनी भूलतंत्र, सुईणपण, दंतशास्त्र ह्यांचा व स्त्रीरोगचिकित्सेचा विशेष अभ्यास केला. त्यासाठी वेगवेगळ्या कॉलेजमध्ये जाऊन खास शिक्षण घेतले. बाळंतपणाचे शास्त्र व बाळंतपणातल्या शस्त्रक्रिया ह्या विषयांत ‘लंडन स्कूल ऑफ मेडिसिन’ येथील परिक्षेत विशेष प्रावीण्य मिळवले. त्याचसोबत शरीराला मालिश करण्याचं तंत्र आणि त्याचा अनुभवही त्यांनी घेतला. वैद्यकीय शिक्षणात स्त्री-पुरुष आपपरभाव न करणाऱ्या ह्या कॉलेजात ‘मुलींना पदवीदान करणे’, हे मात्र विद्यापीठाच्या कायद्यात बसत नसे. तेव्हाच्या पद्धतीप्रमाणे रखमाबाईंनी ही शेवटची परीक्षा ‘ऑनजॉइंट बोर्ड ऑफ द कॉलेजेस ऑफ फिजिशियन्स अँड सर्जन्स ऑफ एडिंबरा अँड ग्लासगो’ (Onjoint board of the colleges of physicians and surgeons of Edinburgh and Glasgow) ह्या स्कॉटलंडच्या संस्थेत दिली आणि त्या उत्तम तऱ्हेने उत्तीर्ण झाल्या. ‘लायसेन्शियेट ऑफ द रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन्स अँड सर्जन्स’ (Licentiate of the Royal College of Physicians and Surgeons) ही पदवी मिळाल्यानंतर त्यांचे नाव इंग्लंडच्या ‘मेडिकल रजिस्टर’मध्ये सनदशीर दाखल झाले.
🔗

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *