महान भारतीय शास्त्रज्ञ सर जगदीशचंद्र बोस यांचा स्मृतिदिन २३ नोव्हेंबरला, तर जन्मदिन ३० नोव्हेंबरला असतो. त्या निमित्ताने, त्यांच्याविषयी हे छोटे टिपण
…….
सर जगदीशचंद्र बोस हे भारतीय शास्त्रज्ञ वनस्पतींच्या वृद्धीचे व प्रकाश, विद्युत्, स्पर्श यांसारख्या बाह्य उद्दीपनांना मिळणाऱ्या वनस्पतींच्या प्रतिसादांचे मापन करण्याकरिता त्यांनी सर्वप्रथम केलेल्या कार्याकरिता जगप्रसिद्ध आहेत. मराठी विश्वकोशातील नोंदीनुसार, ३० नोव्हेंबर १८५८ रोजी बोस यांचा जन्म तत्कालीन बंगालमधील (आताच्या बांगलादेशातील) मैमनसिंग येथे झाला. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण कोलकाता येथील सेंट झेवियर कॉलेजमध्ये झाले. कोलकाता विद्यापीठाची बीए पदवी मिळवल्यानंतर ते वैद्यकाचा अभ्यास करण्यासाठी लंडन विद्यापीठात गेले. तथापि शिष्यवृत्ती मिळाल्याने ते केंब्रिज विद्यापीठात निसर्गविज्ञानाचा अभ्यास करण्याकरिता गेले. तेथे लॉर्ड रॅली या सुप्रसिद्ध भौतिकीविज्ञांच्या मार्गदर्शनाचा त्यांना लाभ मिळाला. १८८४ मध्ये त्यांनी केंब्रिज विद्यापीठाची पदवी संपादन केली. त्यानंतर १८८५ मध्ये कलकत्त्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये भौतिकशास्त्राच्या प्राध्यापकपदावर त्यांची नेमणूक झाली. या पदावर नेमणूक होणारे ते पहिलेच भारतीय असल्यामुळे सुरुवातीला त्यांना वर्णभेदाला तोंड द्यावे लागले; पण काही वर्षांनंतर त्यांची योग्यता ओळखल्यावर असामान्य शास्त्रज्ञांत त्यांची गणना होऊ लागली. १९१५ मध्ये सेवानिवृत्त झाल्यावर कलकत्ता विद्यापीठात गुणश्री प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली. १९१७ साली कलकत्ता येथे त्यांनी बोस रिसर्च इन्स्टिट्यूट ही संशोधन संस्था स्थापन केली आणि अखेरपर्यंत तिचे संचालक म्हणून त्यांनी काम केले.
आपले बिनतारी लहरींचे प्रयोग पुढे नेत असताना बोसना काही विलक्षण गोष्टी सापडल्या. ज्याप्रमाणे धातूच्या वस्तू बिनतारी लहरींना आपल्याकडे आकर्षून घेतात त्याच पद्धतीने जीवसृष्टीमधील सजीव गोष्टींनासुद्धा त्यांचे अस्तित्व जाणवते असे बोसांच्या लक्षात आले. त्यातही वनस्पतींना या लहरींचे भान असते आणि त्या लहरींमुळे त्यांच्यात फरक पडू शकतो असेही बोस यांच्या संशोधनात दिसून आले. तसेच याहून वेगळा प्रयोग म्हणजे जेव्हा वनस्पतींना हरितद्रव्याचा खुराक दिला जातो तेव्हा त्या अगदी माणूस किंवा प्राणी यांच्यासारखेच भूल दिल्यासारख्या वागायला लागतात असे बोस यांच्या लक्षात आले. हा प्रयोग करताना बोसनी एका अतिशय मोठ्या पाइन वृक्षाला हरितद्रव्य पुरवले आणि नंतर तो वृक्ष नीट कापून दुसरीकडे परत एकदा त्याचे रोपण केले. सर्वसामान्यपणे जेव्हा एखादे झाड मुळापासून जमिनीतून उपटले जाते तेव्हा त्याला प्रचंड वेदना होतात. एखाद्या गरीब आणि मुक्या माणसाला किंवा जनावराला खूप त्रास दिल्यावर तो ते नाईलाजाने निमूटपणे सहन करतात; पण त्यामुळे होणारा त्रास त्यांच्या चेहऱ्यावर दिसतो. तसेच कुठल्याही झाडाच्या बाबतीत होत असते, असे संशोधकांनी वारंवार सांगितलेले आहे. त्यामुळे या पाइन वृक्षाच्या बाबतीतसुद्धा तेच होणार यात बोसना काही शंका नव्हती; पण गंमत म्हणजे हरितद्रव्याचा पोषक खुराक मिळाल्यावर हा वृक्ष आनंदाने त्याच्यावर ताव मारत होता आणि त्याची मुळे जमिनीतून उपटल्यावरही त्याला त्याची फिकीर नव्हती. आधी म्हटल्याप्रमाणे जणू त्याला बोसनी भूलच दिली होती!
विज्ञानाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असलेला एक निष्कर्ष बोसनी काढला. झाडांना किती प्रमाणात कार्बन डायऑक्साइडची गरज असते या संदर्भातलं संशोधन त्यांनी केले. झाडांना अमर्याद प्रमाणात कार्बन डायऑक्साइड दिला तरी ती चांगलीच राहतात, तसेच एकदम टवटवीत असतात असे तोपर्यंत मानले जायचे; पण यात तथ्य नसून प्रमाणाबाहेर कार्बन डायऑक्साइड मिळाल्यावर झाडे गुदमरून जातात आणि ज्याप्रमाणे गुदमरलेल्या अवस्थेमधील माणसांना आणि प्राण्यांना पूर्ववत स्थितीमध्ये आणण्यासाठी ऑक्सिजन पुरवावा लागतो त्याचप्रमाणे अशा अवस्थेतील झाडांनाही ऑक्सिजन पुरवावा लागतो असे बोसनी दाखवून दिले.
केंब्रिज विद्यापीठाने त्यांना १८९६मध्ये सन्माननीय डीएससी ही पदवी दिली व रॉयल सोसायटीने त्यांना १९२० मध्ये सदस्यत्व बहाल केले. ब्रिटिश सरकारने १९१७ साली त्यांना ‘नाइट’ हा किताब देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला. त्यांनी युरोप व अमेरिकेत दौरे करून अनेक व्याख्याने दिली. ते अतिशय देशाभिमानी होते व भारतीयांनी आपल्या महान सांस्कृतिक परंपरेत वैज्ञानिक संशोधन करून भर घालावी, अशी त्यांची उत्कट इच्छा होती. त्यांनी कलकत्ता विद्यापीठात आणि नंतर बोस रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये संशोधनाला अतिशय प्रोत्साहन दिले. २३ नोव्हेंबर १९३७ रोजी तत्कालीन बंगालमधील (आताच्या बिहारमधील) गिरिडीह येथे त्यांचे निधन झाले.



