शीख धर्माचे नववे गुरू श्री गुरू तेगबहादूर यांचा आज (२४ नोव्हेंबर) बलिदान दिवस. औरंगजेबाच्या काळात काश्मीरमधील पंडितांना इस्लाम स्वीकारायला लावले जात होते. त्या वेळी गुरू तेगबहादूर यांनी या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला आणि धर्मांतर नाकारल्याबद्दल त्यांना औरंगजेबाने मृत्युदंडाची शिक्षा दिली. दिल्लीतील चांदणी चौक येथे गुरू तेगबहादूर यांना फाशी देण्यात आली. तिथे आज ‘सीसगंजसाहिब’ गुरुद्वारा आहे. त्यांच्याविषयी हे टिपण…
…………
श्री गुरू तेगबहादूर (एक एप्रिल १६२१ – २४ नोव्हेंबर १६७५) हे शीख धर्माचे नववे गुरू होते. त्यांचा जन्म अमृतसर (पंजाब) येथे झाला. श्री गुरू तेगबहादूर यांनी आपल्या आयुष्यात अन्याय, धार्मिक असहिष्णुता आणि अत्याचाराविरोधात लढा दिला. म्हणूनच त्यांना ‘हिंद दी चादर’ या नावाने गौरवले जाते. धर्म, मानवता, आदर्श आणि तत्त्वांच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्यांमध्ये गुरू तेगबहादूर यांचे स्थान जागतिक इतिहासात अद्वितीय आहे. श्री गुरू तेगबहादूर हे जगभर प्रभाव टाकणारे महान गुरू मानले जातात. त्यांच्या शहिदी समागमाचा इतिहास सर्वदूर पोहोचावा यासाठी गुरू तेगबहादूर यांच्या ३५० व्या शहिदी समागमानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विभाग व श्री गुरू तेगबहादूर साहिबजी ३५० शहीदी समागम राज्यस्तरीय समितीच्या वतीने राज्यभर विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
एप्रिल १६२१ मध्ये अमृतसरमध्ये श्री गुरू तेग बहादूर यांचा जन्म वडील गुरू हरगोबिंद आणि माता गुजरी यांच्या कुटुंबात झाला. १६६४ मध्ये त्यांना गुरू ही पदवी प्राप्त झाली तर त्यांचे पुत्र गुरू गोविंदसिंह यांनाही गुरू पदवी प्राप्त झाली होती. गुरू तेगबहादूर यांचे मूळ नाव त्यागमल होते. बालपणी एका युद्धात त्यांनी अतुलनीय शौर्य दाखवले. त्या वेळी त्यांच्या वडिलांनी त्यांना तेग बहादूर म्हणजेच तलवारीसारखा धैर्यवान हे नाव दिले. ते अतिशय शांत, ध्यानशील आणि संयमी स्वभावाचे होते. त्यांनी मोठे भाग्य, संपत्ती, मान नाकारत आनंदपूर साहिब येथे ध्यान आणि सेवा यांमध्ये आयुष्य व्यतीत केले. धार्मिक असहिष्णुता आणि अत्याचाराविरोधात लढा देत असताना त्यांना दिल्लीतील चांदणी चौकातील तुरुंगात ठेवण्यात आले होते. तेथे त्यांनी ध्यान करत, ईश्वराचे स्मरण करण्यास प्राधान्य दिले.
मानवाधिकारांच्या सुरक्षेसाठी काम करत असताना गुरूतेगबहादूर हुतात्मा झाले. त्यांनी लोकांना सत्य, संयम, करुणा आणि धैर्य या मूल्यांचा संदेश दिला. त्यांची अनेक भक्तिगीते गुरू ग्रंथसाहिबमध्ये समाविष्ट आहेत. त्यांनी आनंदपूरसाहिब हे पवित्र स्थळ स्थापन केले. जे आजही शीख धर्मातील अत्यंत महत्वाचे तीर्थस्थान मानले जाते. त्यांच्या बलिदानामुळे ते धार्मिक स्वातंत्र्याचे प्रतीक बनले होते. त्यांच्या स्मरणार्थ त्यांची जयंती देशभरात श्रद्धेने साजरी केली जाते. केंद्र शासनाने २०२२ मध्ये त्यांची ४०० वी जयंती देशभर साजरी केली होती.
त्यांनी देशाला साधे, पण गहन तत्त्वज्ञान दिले व सुमारे ५७ शबद (भक्तिगीते) आणि ५७ सलोक (उपदेशपर पदे) रचले. या रचनांमध्ये वैराग्य, सत्य, मृत्यूचे चिंतन, आत्मज्ञान आणि परमेश्वरावर श्रद्धा या भावना प्रबळ आहेत. त्यांच्या सर्व रचना गुरू ग्रंथसाहिबच्या शेवटच्या भागात आहेत.
‘जो नर दु:ख में दु:ख नहीं मानै,
सुख सनेहु अरू भय नहीं जा कै, कांचन माटी मानै,
लोभ मोह अभिमान न ता कै, हरख सोग नहीं जा कै
जो नर दु:ख में दु:ख नहीं मानै’
म्हणजेच जो मनुष्य दु:खात असला तरी दु:खी होत नाही, जो सुखात असला तरी अहंकार करत नाही, ज्याच्यासाठी सोने आणि माती समान आहेत, जो लोभ, मोह, अभिमान, आनंद आणि शोक यांपासून मुक्त आहे तोच खरा ज्ञानी आहे. अशा अनेक भावपूर्ण आणि मानवी जीवनाचा सार सांगणाऱ्या रचना त्यांनी केल्या आहेत.
‘हिंद दी चादर श्री गुरूतेगबहादूर साहिब’यांच्या ३५०व्या शहिदी समागमनिमित्त विशेष संकेतस्थळाचे आणि गुरू तेग बहादूर यांच्या बलिदानाचा इतिहास सांगणाऱ्या गीताचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. श्री गुरू तेगबहादूर यांच्या बलिदानाचा इतिहास राज्यातील प्रत्येक घरात पोहोचविणे ही सामूहिक जबाबदारी आहे. तसेच, तहसील, शहर, जिल्हा व क्षेत्रीय समितीच्या माध्यमातून प्रत्येक गावात आणि घराघरात गुरू तेगबहादूरांच्या हौतात्म्याचा इतिहास पोहोचवला जाणार आहे.



