मराठी पत्रकारिता आणि मराठी नाट्यक्षेत्र यात महत्त्वपूर्ण योगदान असलेले कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचा २५ नोव्हेंबर हा जन्मदिन. त्यांच्या कार्याची ओळख करून देणारा लेख…
……
कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर (२५ नोव्हेंबर १८७२–२६ ऑगस्ट १९४८) हे एक श्रेष्ठ मराठी नाटककार, संपादक, राजकीय प्रश्नांचे चिकित्सक आणि अध्यात्मवादी होते. त्यांचा जन्म व शालेय शिक्षण सांगलीत झाले. (काही ठिकाणी त्यांच्या जन्मतारखेचा उल्लेख २३ नोव्हेंबर असा आढळतो.) पुणे येथे फर्ग्युसन आणि डेक्कन महाविद्यालयांमध्ये त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेतले. १८९२मध्ये तत्त्वज्ञान हा विषय घेऊन ते बीएची परीक्षा उत्तीर्ण झाले. १८९२ ते ९४ या काळात ते सांगली हायस्कूलमध्ये शिक्षक होते. त्यानंतर मुंबईला कायद्याचा अभ्यास करून ते एलएलबी झाले. १८९३पासून त्यांनी लेखनाला प्रारंभ केला. १८९६मध्ये ‘विविधज्ञान विस्तारा’त प्रसिद्ध झालेल्या महादेव शिवराम गोळे ह्यांच्या ‘ब्राह्मण आणि त्यांची विद्या’ (१८९५) ह्या ग्रंथावरील परीक्षणामुळे लोकमान्य टिळकांशी त्यांचा परिचय झाला व त्यातून त्यांचा पुढे केसरीशी संबंध आला. १८९६मध्ये त्यांनी केसरीत ‘राष्ट्रीय महोत्सव’ हा लेख लिहिला. १८९७मध्ये ते केसरीत दाखल झाले. लोकमान्यांच्या स्वराज्यवादी जहाल भूमिकेशी तन्मय होऊन त्यांनी केसरीत काम केले. अध्यात्मनिष्ठ राष्ट्रवादाचा टिळकांप्रमाणे त्यांनीही पुरस्कार केला.
१९०७मध्ये तिसऱ्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले. १९०८पासून टिळकांच्या तुरुंगवासाच्या काळात ते केसरीचे संपादक होते. १९१७ मध्ये पुण्यातील नाट्यसंमेलनाचे ते अध्यक्ष होते. १९१८मध्ये लोकमान्य टिळक व न. चिं. केळकर हे विलायतेला गेल्यामुळे केसरीचे संपादकपद त्यांनी स्वीकारले. १९२०मध्ये लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर त्यांचा केसरीशी संबंध सुटला. १९२३मध्ये त्यांनी लोकमान्य दैनिकाचे संपादकपद सोडले. त्याच साली स्वत:च्या मालकीच्या नवाकाळ ह्या दैनिकाचे ते संपादक झाले. १९२५मध्ये त्यांनी आठवड्याचा नवाकाळ सुरू केला. १९२७मध्ये हिंदू-मुसलमानांच्या वादावरील लेखाबद्दल ‘नवाकाळ’वर खटला होऊन खाडिलकरांना दंडाची शिक्षा झाली. १९२९मध्ये राजद्रोहाचा खटला झाला व एक वर्षाची शिक्षा झाली.
१९३३मध्ये नागपूर येथे झालेल्या अठराव्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांची एकंदर पंधरा नाटके आहेत. मराठी रंगभूमीच्या आणि मराठी नाट्यवाङ्मयाच्या इतिहासात खाडिलकर या नावाला अनन्यसाधारण स्थान आहे. खाडिलकरांच्या लेखणीमुळे मराठी गद्य आणि संगीत रंगभूमीला खरा वैभवाचा काळ लाभला. खाडिलकरांची नाट्यप्रतिभा सदैव इतिहासकाळात आणि पुराणकाळात रमली. त्या काळातील व्यक्ती आणि घटना यांत दडलेल्या प्रभावी नाट्याने तिला सतत आकर्षून घेतले. खाडिलकरांच्या नाटकांतील संवाद ज्याप्रमाणे अगदी सहजपणे पात्रांच्या परस्परभावसंबंधांचे नाट्य व्यक्त करतात, त्याचप्रमाणे त्यांच्या विविध भूमिकांमधून सूचित होणारे प्रभावी विचारनाट्य व्यक्त करतात. श्रीकृष्ण, कीचक, राम, कच, शुक्राचार्य, रामशास्त्री, राघोबादादा, आनंदीबाई, द्रौपदी, कंकभट ही एकापेक्षा एक अशी अविस्मरणीय पात्रे त्यांनी मराठी रंगभूमीवर उभी केली. खाडिलकरांचे असाधारण नाट्ययश त्यांच्या नाट्यप्रतिभेच्या ह्या विशेषांमध्ये आहे.
(माहिती स्रोत : मराठी विश्वकोश)




अतिशय चांगली माहिती दिलेली आहे. धन्यवाद आणि अभिनंदन
अतिशय चांगला लेख आहे . अभिनंदन आणि धन्यवाद
खूप छान माहिती आहे