गायनाचार्य पं. रामकृष्णबुवा वझे

गायनाचार्य पं. रामकृष्णबुवा वझे यांचा २८ नोव्हेंबर हा जन्मदिन. त्या निमित्ताने, त्यांचे हे स्मरण…
……
स्वतःच्या गायकीचे एक वेगळे वैशिष्ट्य तयार करून गायनाचार्य म्हणून मान्यता पावलेले पं. रामकृष्णबुवा वझे हे आताच्या सिंधदुर्ग जिल्ह्याच्या दोडामार्ग तालुक्यातील वझरे गावचे सुपुत्र. २८ नोव्हेंबर १८७४ रोजी त्यांचा जन्म झाला. संगीतक्षेत्रात अत्यंत विद्वान, रंगतदार आणि बहुरंगी कलावंत म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली होती. त्यांचा आवाज बुलंद होता आणि लयदार आलापी, लडिवाळ बोल−उपज आणि वजनदार ताना हे त्यांच्या गायकीचे वैशिष्ट्य होते. मराठी रंगभूमीला संगीत देऊन त्यांनी नाट्यसंगीतात मोलाची भर घातली. त्यांच्या संगीत कलाप्रकाश (१९३८) या पुस्तकात त्यांच्या काही चिजा समाविष्ट आहेत. तसेच त्यांचे आत्मचरित्रही थोडक्यात दिले आहे.

मराठी विश्वकोशात दिलेल्या माहितीनुसार, पं. रामकृष्णबुवा दहा महिन्यांचे असतानाच त्यांचे वडील वारले. पुढे त्यांची आई त्यांना घेऊन कागल येथे आली आणि मोलमजुरी करू लागली. त्यांचे बालपण फार कष्टात व हालअपेष्टांमध्ये गेले. जेमतेम मराठी चौथ्या इयत्तेपर्यंत त्यांचे शिक्षण झाले. लहानपणापासून बुवांना गाण्याचा नाद होता. त्यामुळे कागलचे गायक बळवंतराव पोहरे यांच्याकडे त्यांचे गाण्याचे प्राथमिक शिक्षण झाले. नंतर ते मालवणला गेले आणि वर्षभर विठोबाआण्णा हडप यांच्याकडे तालीम घेतली. त्या वेळच्या पद्धतीनुसार वयाच्या बाराव्या वर्षी रामकृष्णबुवांचे लग्न झाले. त्यानंतर गवई होण्याच्या तीव्र इच्छेपोटी त्यांनी घर सोडले व पायी प्रवास करून इंदूर गाठले. तेथे सुप्रसिद्ध पखवाज वादक नानासाहेब पानसे यांच्याकडे ते राहिले. गाणे शिकण्याची रामकृष्णबुवांची जिद्द जाणून पानसे यांनी त्यांना ग्वाल्हेरला जाण्यास सांगितले. ग्वाल्हेरमध्ये जाऊन ग्वाल्हेर घराण्याचे सुप्रसिद्ध उस्ताद निसार हुसेनखाँ यांच्याकडे गाणे शिकू लागले. माधुकरी मागून, अत्यंत कष्टाने व जेथून जे मिळेल तेथून ते घ्यायचे अशा वृत्तीने त्यांनी ग्वाल्हेरला गानविद्या संपादन केली.

स्वामी विवेकानंद यांच्या सहवासात ते पंधरा दिवस राहिले होते. अनेक गवयांचाही त्यांनी सहवास केला. गाणे ऐकावयाचे व प्रसिद्ध कलावंतांची सेवा करून विद्या मिळवायची, अशी त्यांची वृत्ती होती. गायक म्हणून ते एक वर्षभर नेपाळलाही होते. आपल्या भ्रमणात ते अनेक कलावंतांचे गाणे ऐकून, शक्य तेथे त्यांच्याकडून बंदिशी मिळवत व संग्रह करत. यातून त्यांनी आपली विद्या संपन्न केली. बारा वर्षांनंतर ते परत आपल्या गावी आले. काही वर्षे गोव्यात राहून वझेबुवांनी अनेक शिष्य-शिष्या घडवल्या. ते गाण्याच्या शिकवण्या घेत असत. ‘बलवंत संगीत मंडळी’ आणि ‘ललितकलादर्श’ या नाटकमंडळींमध्ये ते संगीतगुरू म्हणून काही काळ राहिले. त्यामुळे मुंबई, पुणे, धारवाड इत्यादी अनेक ठिकाणी त्यांचे वास्तव्य झाले. आयुष्याच्या अखेरीस ते पुण्यात स्थायिक झाले आणि तेथेच ५ मे २०२५ रोजी त्यांचे निधन झाले.

चिरंजीव शिवरामबुवा वझे, हरिभाऊ घांगरेकर, केशवराव भोसले, केसरबाई केरकर, मा. दीनानाथ, बापूराव पेंढारकर, भालचंद्र पेंढारकर, दन्नीबाई, तानीबाई, कागलकरबुवा वगैरे कलावंत मंडळींचा त्यांच्या शिष्यवर्गात समावेश होतो. जन्मगावी पं. रामकृष्णबुवांचे स्मारक उभारण्यात आले असून, त्याचे उद्घाटन भालचंद्र पेंढारकर यांच्या हस्ते झाले.

🔗

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *