भारतीय विमान वाहतूक उद्योगाचे जनक जेआरडी टाटा यांचा २९ नोव्हेंबर हा स्मृतिदिन. त्यानिमित्त त्यांच्याविषयी संकलित माहितीचे हे छोटे टिपण
………
जे. आर. डी. या नावाने प्रसिद्ध असलेले जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा हे महान भारतीय उद्योजक होते. त्यांना भारतातील विमान वाहतूक उद्योगाचे जनक मानले जाते. त्यांचा जन्म २९ जुलै १९०४ रोजी पॅरिसमध्ये झाला. मुंबईतील कॅथेड्रल अँड जॉन केनॉन स्कूल येथे ते काही वर्षे शिकले; पण त्यांची आई फ्रेंच असल्याने त्यांचे बालपण मुख्यत: फ्रान्समध्ये गेले.
इंग्लिश खाडी विमानाद्वारे पहिल्यांदा पार करणारे सुप्रसिद्ध फ्रेंच वैमानिक लुईस ब्लेरिअट यांच्या जीवनकार्याने ते खूप प्रभावित झाले होते. त्यामुळे त्यांनीही विमान शिकण्याचा ध्यास घेतला. १९२९ साली त्यांनी वैमानिक म्हणून परवाना मिळवला. असा परवाना मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले. १९३२मध्ये त्यांनी टाटा एअरलाइन्स या पहिल्या भारतीय प्रवासी विमानवाहतूक कंपनीची स्थापना केली. पुढे १९४६मध्ये तिचे नाव बदलून एअर इंडिया असे ठेवले गेले. १९३८मध्ये ते टाटा सन्स उद्योगसमूहाचे चेअरमन बनले. त्यांनी पदभार स्वीकारला, तेव्हा टाटा सन्स उद्योगसमूहाच्या १४ कंपन्या होत्या. त्यांच्या काळात ९१ कंपन्यांची भर पडली. रसायन, वाहन, चहा, माहिती, हॉटेल्स आणि तंत्रज्ञान अशा नवीन क्षेत्रांत त्यांनी टाटा उद्योगसमूहाचा विस्तार केला. त्यांच्या पुढाकाराने १९५६मध्ये कंपनीतील कामगारांच्या कल्याणासाठी खास योजना राबवण्यात आली. त्यामध्ये दिवसातून आठ तास काम, मोफत आरोग्यसेवा, भविष्यनिर्वाह निधी आणि अपघात विमा योजना अशा पायाभूत गोष्टींचा समावेश करण्यात आला. दानशूर व्यक्तिमत्त्व म्हणूनही त्यांची ओळख आहे. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. भारत सरकारने त्यांना १९५७मध्ये पद्मविभूषण, तर १९९२मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्काराने गौरवले. अशा या कर्तृत्ववान उद्योजकाचे २९ नोव्हेंबर १९९३ रोजी निधन झाले. अशा या थोर व्यक्तिमत्त्वास सादर प्रणाम!




अतिशय चांगली माहिती दिलेली आहे . जे आर डी टाटा यांचे अजून काही महत्त्वपूर्ण उल्लेखनीय कार्याची सुद्धा दखल घेऊन नोंद करण्यासारख्या आहेत. उदाहरणार्थ त्यांनी लढवलेली मुंबईतली निवडणूक टाटा पॉवर मधील त्यांचे योगदान इत्यादी..