
आधुनिक काळातील आद्य विज्ञान प्रसारक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाळाजी प्रभाकर मोडक यांचा दोन डिसेंबर हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांची ही थोडक्यात ओळख…
आताच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आचरे गावात जन्मलेल्या बाळाजी प्रभाकर मोडक यांनी मराठीतून विज्ञानप्रसाराचे मोठे कार्य केले. कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून रुजू झाल्यानंतर त्यांनी डॉ. कुक यांच्याकडून रसायनशास्त्राचे सप्रयोग शिक्षण घेतले. १८७५ साली प्रकाशित झालेला त्यांचा ‘रसायनशास्त्र’ हा ग्रंथ या विषयावरील मराठीतील पहिला स्वतंत्र ग्रंथ मानला जातो. त्यांनी रसायनशास्त्राबरोबरच पदार्थविज्ञान, यंत्रशास्त्र आणि प्राणिशास्त्र अशा विषयांवर ४३ पुस्तके लिहिली. मराठीतून शास्त्रीय विषय शिकवण्याची तळमळ असल्याने त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात विज्ञान प्रदर्शने भरवली आणि मराठी विद्यापीठाची संकल्पनाही मांडली.
जन्म : २२ मार्च १८४७, आचरे (दक्षिण कोकण)
मृत्यू : २ डिसेंबर १९०६
शिक्षण : सांगली, बेळगाव आणि पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये
गणिताची सुरुवातीची आवड : सांगलीतील दादा छापखाने या शिक्षकांमुळे
शैक्षणिक व व्यावसायिक कारकीर्द
राजाराम हायस्कूल, कोल्हापूर येथे सहाय्यक शिक्षक
एका वर्षातच राजाराम कॉलेजमध्ये भौतिकशास्त्राचे प्राध्यापक
मुंबई इलाख्याच्या गॅझेटमधील कोल्हापूरविषयक खंडाचे मराठी भाषांतर
डॉ. सेठना आणि डॉ. के. आर. कीर्तिकर यांच्या सहकार्याने कोल्हापूर शिक्षण खात्याच्या सुधारणांचा अहवाल तयार
मोडकांच्या शिफारशीने कोल्हापुरात औद्योगिक वस्तुसंग्रहालय स्थापन
नेटिव्ह जनरल लायब्ररी (आताचे करवीर नगर वाचन मंदिर) व सदर्न मराठा बँकेच्या पुनरुज्जीवनात महत्त्वपूर्ण भूमिका
लेखन व भाषांतरकार्य
एकूण पुस्तके : ४३ (३८ प्रकाशित, ५ अप्रकाशित)
पुस्तकांचे विषय : इतिहास, भूगोल, विज्ञान, बँकिंग
भविष्यात मराठीतून विज्ञानशिक्षण शक्य व्हावे म्हणून २६ विज्ञानविषयक पुस्तके मराठीत लिहिली.
विविध विज्ञानशाखांचा समावेश : यंत्रशास्त्र, सेंद्रिय–असेंद्रिय रसायनशास्त्र, कृषी, प्राणिशास्त्र, खनिज, वनस्पती/प्राणिजन्य पदार्थ, आरोग्यशास्त्र, उष्णता, विद्युत, चुंबकत्व, ध्वनी, प्रकाश इत्यादी शाखांतील त्या काळातील आधुनिक संशोधनाचे मराठीतील पहिले सविस्तर प्रस्तुतीकरण मोडक यांनी केले.
शिल्पकलाविज्ञान मासिकात रंगउद्योग व आधुनिक रंगतंत्रज्ञानावर लेखन
त्यांच्या पुस्तकांतील परिभाषा (इंग्रजी–मराठी) नंतरच्या विज्ञानवाङ्मयात व आजच्या पाठ्यपुस्तकात स्वीकारली गेली.
विज्ञानप्रसारासाठी पुस्तके कमी दरात प्रकाशित करण्याचा त्यांचा आग्रह
पहिले वैज्ञानिक पुस्तक – रसायनशास्त्र — पूर्वार्ध
पुण्यात डॉ. सॅम्युअल कुक यांच्याकडून घेतलेल्या सिद्धांत–प्रात्यक्षिक प्रशिक्षणानंतर सप्रयोग व्याख्यानमालेतून या पुस्तकाचा जन्म.
विष्णुशास्त्री चिपळूणकर व भाईसाहेब गुप्ते यांनी कौतुक केले.
चित्रे, प्रयोग व दैनंदिन उदाहरणांतून वैज्ञानिक ज्ञान सहज समजावणारी शैली
विज्ञान प्रदर्शने (१८८३–१८९६)
कोल्हापूर सरकारच्या अर्थसाह्याने नाताळ सुट्टीत दर वर्षी विज्ञान प्रदर्शन
वृत्तान्त : शिल्पकला विज्ञान आणि करमणूक मासिकांत
मांडलेली उपकरणे :
क्ष-किरणयंत्र, कॅमेरा, वायुभारमापक, उष्णतामापक, सूक्ष्मदर्शक, फॅरेडेचे भेंडोळे, तारायंत्र, फोनोग्राफ, पाणचक्की, स्वयंचलित वाहन, शस्त्रक्रिया व अभियांत्रिकी उपकरणे, कॅलिडोस्कोप
प्रदर्शनांमुळे दक्षिण महाराष्ट्रात पहिल्यांदा विजेचे दिवे दाखल
१५–१६ हजार प्रेक्षक आकर्षित करणारी, सुनियोजित विज्ञानप्रदर्शने — १९व्या शतकातील भारतात अभूतपूर्व प्रदर्शने.
आबासाहेब कागलकर (शाहू छत्रपतींचे जनक वडील) त्यांना खर्चिक प्रयोग साहित्य आणून देत
बाळासाहेब मिरजकर (गंगाधर पटवर्धन) — वैज्ञानिक लेखन व गणेश कलागृह प्रयोगशाळेची निर्मिती
औद्योगिक पाहणी (१८९२–१८९५)
कोल्हापूर व मांडलिक संस्थानांची सखोल औद्योगिक पाहणी
भारतीय दृष्टिकोनातून केलेल्या शिफारशी :
मोफत व्यवसाय शिक्षण
सक्तीचे प्राथमिक शिक्षण
आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार
कारागीर, शेतकरी, उद्योगधंद्यांची स्थिती सुधारण्याचे उपाय
खनिज, जंगले, उद्योगोपयोगी वनस्पती, ग्रामीण कर्जबाजारीपणाचे सर्वांगीण विश्लेषण
ही पाहणी भारताची पहिली संघटित औद्योगिक सर्वेक्षण मोहीम मानली जाते
या कार्यासाठी मोडकांना पारितोषिक द्यावे, अशी शिफारस लोकमान्य टिळकांनी केली.
स्वदेशी चळवळीतील सहभाग
कोल्हापूरच्या स्वदेशी वस्तू विक्रेत्यांशी घनिष्ठ संबंध
तळेगावातील वि. गो. विजापूरकर यांच्या समर्थ विद्यालयाशी जवळीक
भारतीय भाषांमधून सर्वसामान्यांना विज्ञान शिकविले तरच उद्योग स्वावलंबी बनतील, स्वदेशी चळवळ मजबूत होईल. भारतीय कारागिरांना आधुनिक तंत्रज्ञान शिकवण्यासाठी परदेशात प्रशिक्षणाला पाठवावे, शाळा–महाविद्यालयांत भारतीय भाषांबरोबर इंग्रजीतील विज्ञानपरिभाषाही शिकवावी, अशी सूचना मोडक यांनी केली.
(माहिती स्रोत : मराठी विश्वकोश)



