राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तृतीय सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांचा ११ डिसेंबर हा जन्मदिन. त्या निमित्ताने त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा हा अल्प-परिचय…
बाळासाहेब देवरस म्हणून ओळखले जाणारे मधुकर दत्तात्रय देवरस यांचा जन्म ११ डिसेंबर १९१५ रोजी नागपूरमध्ये दत्तात्रय कृष्णराव देवरस आणि पार्वतीबाई यांच्या पोटी झाला. त्यांचे भाऊ भाऊराव देवरस हेदेखील प्रचारक आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ कार्यकर्ते होते. बाळासाहेबांचे शिक्षण न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये झाले. त्यांनी १९३१मध्ये मध्य प्रांताच्या बेरार माध्यमिक शिक्षण मंडळातून मॅट्रिक केले. त्यानंतर त्यांनी मॉरिस कॉलेजमध्ये (आताचे नागपूर महाविद्यालय) प्रवेश घेतला. त्याच कॉलेजमधून त्यांनी पदवी प्राप्त केली आणि नंतर नागपूर विद्यापीठाच्या लॉ कॉलेजमधून एलएलबी पदवी घेतली. ते आरएसएसशी स्थापनेपासूनच संबंधित होते.
डॉ. हेडगेवार यांच्या प्रेरणेने बाळासाहेबांनी आपले जीवन राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी समर्पित करण्याचा निर्णय घेतला आणि ते प्रचारक बनले. प्रचारक म्हणून त्यांचा पहिला कार्यकाळ फाळणीपूर्वी बंगालमध्ये होता. १९४६मध्ये त्यांची संघाचे सहसरकार्यवाह (संयुक्त सरचिटणीस) म्हणून नियुक्ती झाली. १९६५मध्ये त्यांना सरकार्यवाह (सरचिटणीस) या पदावर बढती देण्यात आली. दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या निधनानंतर पाच जून १९७३ रोजी ते सरसंघचालक झाले.
देवरस यांचे एक प्रमुख योगदान म्हणजे अस्पृश्यतेविरुद्धचे त्यांचे धर्मयुद्ध. १९७४मध्ये त्यांनी घोषणा केली, की ‘जर अस्पृश्यता चूक नसेल, तर जगात काहीही चूक नाही.’ यामुळे भारतीय सामाजिक व्यवस्थेचा एक प्रमुख शाप असलेल्या अस्पृश्यतेच्या धोक्याविरुद्ध लढण्याच्या राष्ट्रीय प्रयत्नांना मोठी चालना मिळाली.
एक उत्कृष्ट संघटक म्हणून त्यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीविरुद्धच्या लढ्याचे नेतृत्व केले. गांधींनी आरएसएसवर बंदी घातली होती. परंतु बाळासाहेबांच्या गतिमान आणि व्यावहारिक नेतृत्वाखाली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या अडचणीला यशस्वीपणे तोंड दिले. अत्यंत बुद्धिमान असलेल्या बाळासाहेबांनी विविध स्तरांवरील कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधण्याच्या प्रक्रियेला अत्यंत आवश्यक असलेली चालना दिली. स्वयंसेवकांच्या मनात निर्माण होणाऱ्या अनेक शंकांची उत्तरे शोधण्यासाठी ते स्वतः तासन् तास बसून राहायचे. संघ परिवारातील कार्यकर्त्यांची खात्री पटवून देण्यासाठी हा द्विपक्षीय बौद्धिक प्रतिसाद खूप उपयुक्त ठरला. राष्ट्रीय स्तरावर वेगाने बदलणाऱ्या बौद्धिक अजेंडाच्या पार्श्वभूमीवर, हिंदू जागरूकता आणि हिंदुत्वाचा अभूतपूर्व उदय केंद्रस्थानी येत असताना, अशा संघटनात्मक दिशानिर्देशाची विशेषतः आवश्यकता होती.
बाळासाहेब १९९४पर्यंत सरसंघचालक म्हणून कार्यरत राहिले. त्यानंतर प्रकृतीअस्वास्थ्यामुळे त्यांनी पद सोडले. १७ जून १९९६ रोजी देवरस यांचे निधन झाले.
(संकलित माहिती)



