समर्थशिष्य कल्याणस्वामींचे समाधीमंदिर डोमगाव (ता. परांडा, जि. धाराशिव) येथे आहे. त्याविषयी माहिती देणारा हा लेख….
……
श्रमहरणी सीना नदीच्या काठी वसलेले डोमगाव परांड्यापासून १० किलोमीटर अंतरावर आहे. परांड्यापासून करमाळ्याकडे जाताना डोमगाव फाटा लागतो. तिथून आत तीन-साडेतीन किलोमीटर अंतरावर श्री कल्याणस्वामी समाधीमंदिर आहे. मंदिर उंचवट्यावर आहे. परांड्याला देहत्याग केल्यावर स्वामींचे पार्थिव डोमगाव येथे आणून त्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या स्थानी श्री कल्याणस्वामींची वालुकाश्म समाधी आहे. श्री कल्याणस्वामींच्या नंतर त्यांचे उत्तराधिकारी श्री मुद्गल स्वामी यांच्या कारकिर्दीत तेथे भव्य दगडी समाधीमंदिर बांधण्यात आले. हे मंदिर बांधण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांच्या स्नुषा आणि छत्रपती शाहू महाराजांच्या पत्नी महाराणी सकवार बाईसाहेब यांनी द्रव्य दिले आहे.
मंदिराच्या बाहेरील बाजूस ओवऱ्या असून, त्या शिष्यपरंपरेतील कळेगावकर इनामदार यांनी १८०८मध्ये बांधल्या. त्यातील एका ओवरीमध्ये अकरा मारुती कोरलेले आहेत. समाधीमंदिराच्या अगदी समोर श्री मुद्गलस्वामींची समाधी असून, तिच्यावर दाससमारुती आहे. मंदिरामध्ये दोन मजली सागवानी लाकडी मंडप असून, तो मठपती श्रीरामबुवा जहागीरदार यांनी १९४८मध्ये बांधला. मंदिरामध्ये एकूण चार शिलालेख कोरलेले आहेत. मंदिराच्या पाठीमागेदेखील एक मारुती आहे.
या मठामध्ये रामदासी संप्रदायाचा अनमोल ठेवा असलेला श्री कल्याणस्वामी लिखित ‘श्रीमंत दासबोध’ आहे. तसेच कल्याणशिष्य केशवस्वामी यांच्या हस्ताक्षरातील दासबोध, श्री समर्थांनी श्री कल्याणस्वामींना दिलेला सुवर्णाक्षरी कित्ता इत्यादी वस्तू आहेत. श्रीरामनवमी, दासनवमी, श्री हनुमानजयंती, श्री कल्याणस्वामी पुण्यतिथी हे इथले प्रमुख उत्सव होत. गेल्या ३०० वर्षांच्या परंपरेने जहागीरदार घराण्याकडे मठपतित्व असून, ते निरंतर श्री कल्याणस्वामींच्या सेवेमध्ये रत आहेत. सुरुवातीच्या काही पिढ्या मठपती ब्रह्मचारी असून, नंतर ही परंपरा गृहस्थाश्रमी झाली.
इतिहास
समर्थ रामदास स्वामी यांचे पट्टशिष्य श्री कल्याणस्वामी हे श्री समर्थांच्या मुखातून जे काही उत्स्फूर्त काव्य होत असे ते लिहून घेत. इ. स. १६५२ ते इ. स. १६६० या काळामध्ये ग्रंथराज दासबोधाची रचना शिवथरघळीमध्ये झाली. तो श्री समर्थांनी सांगितला आणि श्री कल्याणस्वामींनी लिहून घेतला. चाफळ श्रीराम मंदिराचे निर्माणकार्य चालू असताना श्री समर्थांनी एकाच बैठकीमध्ये २०५ ‘मनाचे श्लोक’ सांगितले आणि श्री कल्याणस्वामींनी ते लिहून घेतले. श्री कल्याणस्वामी एका रात्रीत दासबोध लिहून काढत. अशा अनेक कथा त्यांच्या लेखनाबद्दल सांगितल्या जातात.
साधारणतः १६७८ साली गुरू-इच्छा हीच गुरू-आज्ञा असे समजून श्री कल्याणस्वामी जगदुद्धारासाठी निघाले. कोठे जायचे याचे काही पूर्वसंकेत होतेच. श्रमहरणी सीना नदीच्या तीरावरून जात असताना श्री समर्थांनी श्री कल्याणस्वामींना काही खूण सांगितली होती. त्या ठिकाणीच श्री कल्याणस्वामींची कर्मभूमी होती. श्री समर्थांनी श्रीकल्याणस्वामींना ती जागा, तो प्रदेश सांगितला.
कोठे जावे हे न धरी शंका । सुखविता होईल श्रीरामरक्षा ।
सीना नदी तरी करूननी वैशाखा । राहिलो होतो त्र्यह दिवस ।।
— दासबोधधाम
एक शुभ दिवस पाहून श्री कल्याणस्वामींनी सज्जनगडातून डोमगाव, परांड्याकडे प्रस्थानाची सिद्धता केली. आदल्या दिवशी सज्जनगडावर श्री कल्याणस्वामींचे कीर्तन झाले. सर्व श्रोतावर्ग भक्तिरसामध्ये रंगला. कीर्तन झाल्यावर श्री समर्थांनी श्री कल्याणस्वामींना स्वतःच्या हातातील जपमाळ दिली आणि अखेरचा दिवस उजाडला. ३०–३२ वर्षे ज्यांची अखंड सेवा केली, त्या श्री समर्थ चरणांवर श्री कल्याणस्वामींनी डोके ठेवले. श्री समर्थांनी आपल्या प्रिय शिष्योत्तमाला आशीर्वाद दिला. श्री कल्याणस्वामींबरोबर अन्य शिष्यपरिवारही होता. त्यांना निरोप देण्यासाठी गडावरील सर्व भक्तमंडळी खाली पायथ्यापर्यंत आली.
प्रभू श्रीरामचंद्रांच्या कार्याकरिता श्री कल्याणस्वामी सज्जनगड सोडून परांड्याकडे निघाले. श्री समर्थांचे आज्ञापालन करण्यासाठी श्री कल्याणस्वामी श्रमहरणी सीना नदीच्या दिशेने वाटचाल करू लागले. इ. स. १७१४ हे वर्ष होते. श्री कल्याणस्वामी परांडा इथे होते. त्या वेळी आषाढ हा अधिक मास होता. परांड्याच्या मठामध्ये श्री कल्याणस्वामी रामायण सांगत होते. हे रामायण ऐकण्यासाठी अनेक साधूसंत आले होते. ती परमपवित्र रामकथा ऐकून सर्व जण तृप्त झाले. इकडे प्रति वर्षाप्रमाणे श्रीकृष्णस्वामी आपल्या गुरूच्या दर्शनासाठी डोमगावला निघाले. परंतु निघताना त्यांनी आपल्याबरोबर चाफळहून श्री समर्थांच्या अस्थी घेतल्या. डोमगाव येथून तसेच पुढे जाऊन काशीला श्री समर्थांच्या अस्थी विसर्जित कराव्यात, असे त्यांनी ठरवले होते. परांडा येथे अघटित घडले . आपले समर्थ चाफळहून अंतिम प्रवासास निघाले आहेत हे कळताच योगिराज श्री कल्याणस्वामींनी योगबलाने परांडा येथे देह ठेवला. ते गर्भासनामध्ये बसले. योगसमाधीत त्यांनी आपले प्राण समर्थचरणी विलीन केले. ती तिथी होती अधिक आषाढ शुद्ध त्रयोदशी, शके १६३६. इ. स. १७१४.
श्री कल्याणस्वामी समाधिस्थ झाल्यावर श्री मुद्गलस्वामींना स्वप्नदृष्टांत झाला – ‘श्रमहरणी सीना नदीच्या काठी जिथे गाय असेल, तेथे मी समाधीरूपाने आहे.’ त्यानंतर दुसऱ्या दिवशी श्री मुद्गलस्वामी व इतर शिष्य त्या भागामध्ये गेले असता त्यांना खरोखरच गाय दिसली. तेथे खोदकाम केल्यावर समाधी सापडली. त्यानंतर त्या शिलेची स्थापना अंत्यसंस्काराच्या जागी डोमगाव येथे करण्यात आली व तेथे भव्य मंदिर बांधण्यात आले.
डोमगाव हे श्रमहरणी सीना नदीकाठी वसलेले गाव आहे. या नदीवर आता सीना–कोळेगाव धरण प्रकल्प झाला आहे. त्यामुळे जुने डोमगाव पाण्याखाली गेले आहे. गावाचे पुनर्वसन होऊन डोमगाव क्र. एक व दोन अशी गावे निर्माण झाली आहेत. मंदिराच्या कडेने भराव टाकून मंदिर सुरक्षित करण्यात आले आहे. धरणाच्या जलसाठ्यास कल्याणसागर असे सार्थ नामाभिधान देण्यात आले आहे. मंदिरापर्यंत जाण्यासाठी चांगला डांबरी रस्ता आहे. नुकतेच ‘आयटीआय’लाही कल्याणस्वामी महाराज असे नाव देण्यात आले आहे.
(या लेखामधील इतिहास श्री. सचिन अशोक जहागीरदार (रामदासी) यांच्या ‘कल्याणस्वामी’ या पुस्तकातून घेतला आहे.)





