दर वर्षी २१ जून रोजी जागतिक योगदिन साजरा करण्यात येतो. आपल्या प्राचीन योगप्रकाराला खऱ्या अर्थाने जागतिक मंचावर नेणारे योगाचार्य बी. के. एस. अय्यंगार यांचा १४ डिसेंबर हा जन्मदिन. त्यांच्या कार्याचा हा थोडक्यात परिचय…
……….
कर्नाटक राज्यात कोलारमध्ये १४ डिसेंबर १९१८ रोजी बी. के. एस. अय्यंगार यांचा जन्म वडील श्री कृष्णमाचार आणि आई शेषम्मा यांच्या पोटी झाला. लहानपणी त्यांना मलेरिया, टायफॉइड, क्षयरोग (टीबी), सामान्य कुपोषण अशा आजारांनी ग्रासलेले होते. १९३४मध्ये त्यांनी योगी श्री तिरुमलाई कृष्णमाचार्य (आधुनिक योगाचे जनक) यांच्याकडून योगाचे प्रशिक्षण घेतले. अय्यंगार यांनी जयप्रकाश नारायण यांनादेखील योग शिकवला. इतकेच नव्हे, तर बेल्जियमच्या महाराणी एलिझाबेथ यांना वयाच्या ८०व्या वर्षी शीर्षासन शिकवले. अशा किती तरी प्रसिद्ध व्यक्तींना त्यांनी योगप्रशिक्षण दिले. १९६६मध्ये यांनी ‘लाइट ऑन योगा’ हे स्वत:चे पहिले पुस्तक प्रकाशित केले. त्यात २००हून अधिक योगासने आहेत. त्यांची ‘लाइट ऑन प्राणायाम,’ ‘लाइट ऑन योगसूत्राज ऑफ पतंजली,’ ‘लाइट ऑन लाइफ’सारखी अनेक पुस्तके आहेत. अय्यंगार यांनी १९७५मध्ये राममणी अय्यंगार मेमोरियल योगा इन्स्टिट्यूटची पुण्यात स्थापना केली.
भारताला जागतिक स्तरावर योगक्षेत्रात सन्मान आणि ओळख मिळवून देणारे योगाचार्य बी. के. एस. अय्यंगार यांना त्यांच्या अमूल्य योगदानासाठी भारत सरकारने १९९१ साली पद्मश्री, २००२ साली पद्मभूषण, तर २०१४ साली पद्मविभूषण हे पुरस्कार बहाल केले. २० ऑगस्ट २०१४ रोजी पुण्यात वयाच्या ९५व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
(संकलित माहिती)



