नागपुरातल्या खेड्यातला दिव्यांग अमोल झाला ‘वर्ल्ड स्ट्राँग मॅन’; मुख्यमंत्री फडणवीसांच्या भाषणाने दिली प्रेरणा

तीन डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्ताने, एका दिव्यांग खेळाडूची प्रेरक यशोगाथा…
……….

जन्मतःच दोन्ही पायांनी अधू असल्याने आपले पुढे कसे होणार असा प्रश्न त्याला पडायचा; पण काय करावे कळत नव्हते; मात्र त्याच अमोलने क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून घेतलेली भरारी इतरांसाठी प्रेरणादायी आहे. ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका भाषणाने आपल्यात जिद्द निर्माण झाली आणि पायांनी अधू असूनही काही भरीव काम करू शकलो,’ असा कृतज्ञतापूर्वक उल्लेख अमोल करतो.

नागपूर जिल्ह्यातील वलनी या खेड्यातून अमोल वाळके शिक्षणासाठी नागपुरात आला. जन्मतःच त्याचे दोन्ही पाय अधू होते; मात्र वयाच्या दहाव्या वर्षी आयुर्वेदिक औषधांनी एका पायात बऱ्यापैकी जोर आला; पण एक पाय अधू असल्याने त्याला सारे ‘लंगड्या’ म्हणून संबोधायचे. त्या वेळी त्याला खूप वाईट वाटायचे. त्यामुळे आपणही आयुष्यात काही वेगळे करावे, असे त्याला वाटायचे. मुख्यमंत्री फडणवीस यांचे भाषण ऐकल्यानंतर त्याला तो मार्ग सापडला होता. थायलंडमध्ये झालेल्या १२व्या जागतिक स्ट्रेंथलिफ्टिंग आणि इनक्लाइन बेंच प्रेस चॅम्पियनशिप २०२५मध्ये दिव्यांगांच्या स्पर्धेत अमोलने भारताचे प्रतिनिधित्व केले आणि भारोत्तोलन स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. वर्ल्ड स्ट्राँग मॅन हा किताब त्याने पटकावला. देश-विदेशातील स्पर्धांमध्ये त्याने भारोत्तोलन, पंजा कुस्ती अशा विविध क्रीडाप्रकारांत पदकांची कमाई केली आहे. त्याच्या एका पायाला कमरेपासून कॅलिपर लावले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळोवेळी दिलेल्या प्रोत्साहनामुळे आज अमोल एक यशस्वी उद्योजक आहे आणि त्याने शेकडो तरुणांना रोजगार दिला आहे. त्यामुळे पाचशेहून अधिक दिव्यांग आपल्या पायावर उभे राहिले आहेत.

दिव्यांग संवाद या उपक्रमाद्वारे दिव्यांगांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्याची धडपड सुरू आहे. नागपुरात जिम सुरू करून दिव्यांग तरुणांना अमोल पंजा कुस्तीचे प्रशिक्षण देत आहे. एखादे सकारात्मक भाषण एखाद्या व्यक्तीचा कसा कायापालट करू शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे आपले आयुष्य असल्याचे त्याने सांगितले.

(स्रोत : महासंवाद)

🔗

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *