भा. रा. तांबे

भास्कर रामचंद्र तथा भा. रा. तांबे यांचा सात डिसेंबर हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने…
………
‘जन पळभर म्हणतील हाय हाय…’ हे गाणे सर्वांनी कधी ना कधी ऐकले असेल. लतादीदींचा आर्त स्वर आणि वसंत प्रभू यांचे मंत्रमुग्ध करणारे संगीत. या प्रसिद्ध गाण्याचे गीतकार होते भा. रा. तांबे अर्थात भास्कर रामचंद्र तांबे. त्यांचा जन्म २७ ऑक्टोबर १८७३ रोजी मध्य भारतात मुंगावली (मुगावली) येथे झाला. शिक्षण झांशी आणि देवास येथे झाले. आर्थिक प्रतिकूलतेमुळे त्यांना उच्च शिक्षण घेता आले नाही. मध्य भारतातच वेगवेगळ्या ठिकाणी युवराजशिक्षक, दिवाण, पोलीस, सुपरिंटेंडंट, सरकारी वकील, न्यायाधीश, शिक्षणखात्यात परीक्षा विभागाचे रजिस्ट्रार अशा नोकऱ्यांमध्ये त्यांचे जीवन व्यतीत झाले. १९३७ मध्ये ते ग्वाल्हेर संस्थानाचे राजकवी झाले.
त्यांची कविता प्रथम संग्रहरूपाने १९२०मध्ये रसिकांपुढे आली. दुसरा भाग १९२७ साली आणि समग्र कविता १९३५ साली प्रकाशित झाली. त्यामध्ये एकूण २२५ कविता आहेत. काही हिंदी कवितांचाही त्यात अंतर्भाव आहे. तिन्ही संग्रहांना अनुक्रमे मायदेव, अज्ञातवासी आणि माधव जूलियन हे कवीच संपादक लाभले. स्वतः तांबे हे मात्र आपल्या कवितेच्या प्रसिद्धीबाबत बेफिकीर असत. तांबे यांना संगीताचे चांगले ज्ञान होते व त्यांच्या अनेक कवितांवर त्या कोणत्या रागांत गायल्या जाव्यात, यासंबंधीच्या सूचना त्यांनी देऊन ठेवलेल्या आहेत. तांब्यांचे काव्यविषयीचे गद्यलेखनही लक्षणीय आहे.

१९२६मध्ये भरलेल्या मध्य भारतीय कविसंमेलनाचे ते अध्यक्ष होते. १९३२मध्ये कोल्हापूर येथे भरलेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनातील कविसंमेलनाचे ते अध्यक्ष होते. ग्वाल्हेरमध्ये त्यांचे ७ डिसेंबर १९४१ रोजी निधन झाले.

(संदर्भ – मराठी विश्वकोश)

🔗

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *