सशस्त्र सेना ध्वजदिन निधीत आपलेही हवे योगदान!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (आठ डिसेंबर) नागपूरमध्ये ‘सशस्त्र सेना ध्वजदिन – २०२५’निमित्त निधी संकलनाचा प्रारंभ केला. मातृभूमीच्या रक्षणासाठी, देशाच्या सार्वभौमत्वासाठी आणि भारतीयांच्या सुरक्षिततेसाठी रात्रंदिवस सीमेवर तैनात असणाऱ्या आपल्या शूर सैनिकांच्या शौर्य, समर्पण आणि देशसेवेला सलाम करण्याचा दिवस म्हणजे सशस्त्र सेना ध्वज दिन! केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी अनेक योजना राबवल्या जातात. परंतु देशवासीयांनाही सैनिकांप्रति कर्तव्य बजावण्याची संधी मिळावी आणि जनसहभागातूनही सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी थेट निधी देता यावा, यासाठी ध्वजदिन निधी संकलन करण्यात येते. दर वर्षीप्रमाणे या वर्षीही ७ डिसेंबर रोजी सशस्त्र सेना ध्वज दिन राष्ट्रभक्तीच्या उत्साहात देशभर साजरा करण्यात आला.

ध्वजदिनाची पार्श्वभूमी
२८ ऑगस्ट १९४९ रोजी देशाच्या तत्कालीन संरक्षण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत दर वर्षी सात डिसेंबर रोजी ध्वजदिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. या दिवशी नागरिकांना सशस्त्र सेनेचे प्रतीक असलेले छोटे ध्वज वितरित करून निधी संकलनाची परंपरा सुरू करण्यात आली. १९९३मध्ये संरक्षण मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली विविध सैनिक कल्याण निधी एकत्र करून त्याचे एकत्रित नाव “सशस्त्र सेना ध्वज दिन निधी” असे ठेवण्यात आले. तसेच हा निधी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी वापरण्यात येऊ लागला.

ध्वजदिनाचा उद्देश

  • नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करणे.
  • सैनिकांच्या त्यागाचे आणि योगदानाचे स्मरण करुन देणे.
  • शहीद सैनिकांचे कुटुंब, जखमी जवान, माजी सैनिक यांच्या कल्याणासाठी मदत उपलब्ध करणे.
  • सैनिकांसाठी नागरिकांमध्ये कर्तृत्व, दातृत्व निर्माण करणे.
  • तसेच राष्ट्रीय एकात्मता आणि सहकाराची भावना वाढीस लावणे, हे ध्वजदिनाचे उद्देश आहेत. हा निधी लोकसहभागातून संकलित केला जातो आणि तो थेट सैनिक व त्यांच्या कुटुंबांच्या कल्याणासाठी वापरला जातो.
  • ध्वजदिन निधी संकलन कशासाठी?
    ध्वजदिन निधीमधून सैनिकांच्या कल्याणासाठी अनेक उपक्रम राबविण्यात येतात. जखमी आणि अपंग सैनिकांवर उपचार, त्यांचे पुनर्वसन, निवृत्त सैनिकांना आरोग्य सुविधा, निवृत्ती वेतन, शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत, तसेच सैनिकांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती असे अनेक उपक्रम सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांचे जीवनमान उंचावण्यासाठी राबवले जातात. घरातला कर्ता पुरुष गेल्यानंतर एखादे कुटुंब उघड्यावर पडू नये, यासाठी शासन आपली जबाबदारी निभवते, परंतु सामाजिक दायित्व म्हणून त्यांच्या पाल्याप्रति सहवेदना व्यक्त व्हावी हादेखील यामागचा उद्देश आहे.
  • निधीचा वापर
    राज्यात संकलित झालेल्या सशस्त्र सेना ध्वजदिन निधीमधील ६० टक्के निधी राज्याच्या सैनिक कल्याण विभागाच्या मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीद्वारे निर्धारित धोरणानुसार सेवारत तथा माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांवर खर्च केला जातो. उर्वरित ४० टक्के निधी राज्याच्या राज्यपालांच्या अध्यक्षतेखालील समितीद्वारे निर्धारित धोरणानुसार सैनिक मुला-मुलींची वसतिगृहे व सैनिक विश्रामगृहे निर्माण करण्यासाठी व चालवण्यासाठी वापरला जातो.
  • निधी संकलन
    सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनासाठी सन २०२३ सालासाठी महाराष्ट्र राज्याला ३६ कोटी ६४ लाख रुपये उद्दिष्ट दिले होते. परंतु ४३ कोटी ६८ लाख २ हजार ५४ रुपये म्हणजेच ११९.२१ टक्के निधी संकलित झाला. २०२४ या वर्षासाठी ४० कोटी रुपये उद्दिष्ट देण्यात आले होते. नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे ४८ कोटी ९४ लाख ८१ हजार ३१८ रुपये म्हणजेच १२२.३७ टक्के निधी संकलित झाला आहे. ही आकडेवारी देशवासीयांच्या देशभक्तीची, सैनिकांप्रति असलेल्या आदराची, प्रेमाची, सन्मानाची व अभिमानाची साक्ष असून या निधीच्या माध्यमातून आपणही सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी थेट योगदान देऊ शकतो.
  • उत्कृष्ट निधी संकलनाबद्दल राज्यपालांच्या हस्ते सन्मान
    सशस्त्र सेना ध्वजदिन २०२४ निधी संकलनात सर्वांत जास्त निधी संकलन केल्याबद्दल छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त, तसेच सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, सोलापूर, बीड, अमरावती, नागपूर या सहा जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी तथा ध्वजदिन निधी कल्याण समितीचे अध्यक्ष व जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांना मुंबई येथील लोकभवनमध्ये १० डिसेंबर २०२५ रोजी होणाऱ्या ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ कार्यक्रमात राज्यपालांच्या स्वाक्षरीचे प्रशस्तिपत्र व स्मृतिचिन्ह देऊन राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.

अनेक व्यक्ती, संस्थांचे योगदान – सैनिकांप्रति कृतज्ञता म्हणून अनेक स्वयंसेवी संस्था, उद्योग संस्था, संघटना, विद्यार्थी, शिक्षक, शासकीय, खाजगी क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी, देशवासीय नागरिक मोठ्या प्रमाणात स्वेच्छेने देणगी देतात.

✦ निधी जमा करण्यासाठी

  • संचालक, सैनिक कल्याण विभाग, पुणे यांच्या नावाने
    बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा घोरपडी, पुणे
    Name of Account : FLAG DAY FUND (PUBLIC) Bank A/c No. : 60061347784, IFSC Code- MAHB0000184, MICR Code-411014004 यामध्ये
  • रोख, धनादेश अथवा CBSद्वारे ध्वज निधी जमा करता येतो.
  • आपल्या नजीकची शाळा, महाविद्यालय किंवा राज्य शासनाचे कार्यालय, तसेच प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात निधी देता येतो.
  • सशस्त्र सेना ध्वजदिन निधीसाठी दिलेली संपूर्ण रक्कम आयकर कायदा १९६१ कलम ८० जी (५) (vi) अन्वये करमुक्त आहे. त्यासाठीचे आयकर सवलतीचे प्रमाणपत्र आवश्यतेनुसार संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय किंवा सैनिक कल्याण विभाग, पुणे येथून दिले जाते.
  • संकल्प एक – योगदान हजारोंचे
    तहानभूक विसरून, कुटुंबापासून दूर.. देशाच्या सीमेवर तैनात असलेले सैनिक हे ऊन, वारा पाऊस, थंडीत मृत्यूच्या छायेत दररोज झुंजतात.. ते केवळ कर्तव्य म्हणून नाही, तर देशसेवेचे व्रत पाळण्यासाठी. देशाच्या संरक्षणासाठी सर्वस्व पणाला लावणाऱ्या सैनिकांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी वापरण्यात येणाऱ्या सशस्त्र सेना ध्वज दिन निधीमध्ये अमूल्य योगदान करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. प्राण पणाला लावून देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञतेची भावना केवळ शब्दांनी नव्हे, तर कृतीतून व्यक्त करण्याची संधी म्हणजे ध्वजदिन. ध्वजदिन निधी संकलनासाठी सन २०२५ सालासाठी ४० कोटी निधी संकलित करण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र राज्यासाठी आहे. चला तर मग… सशस्त्र सेना ध्वजदिनानिमित्त आपल्या सैनिकांना सलाम करू या.. ध्वजदिन निधीमध्ये आपला मोलाचा हातभार लावू या!

– वृषाली मिलिंद पाटील
सहायक संचालक (माहिती)
विभागीय माहिती कार्यालय, कोल्हापूर

(स्रोत : महासंवाद)

🔗

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *