प्रत्येक माणूस महत्त्वाचा आहे

दर वर्षी १० डिसेंबर हा दिवस जागतिक मानवी हक्क दिन म्हणून साजरा केला जातो. हा फक्त कॅलेंडरवरचा एक दिवस नसून, माणसाच्या मूलभूत अधिकारांचा सन्मान करण्याचा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. मानवी हक्क म्हणजे नेमके काय? आपण जन्माला आलो की आपल्याला काही गोष्टी आपोआप मिळतात. या गोष्टींना आपण मानवी हक्क म्हणतो. हे हक्क सरकार देत नाही, शाळा देत नाही, घरचे देत नाहीत, तर प्रत्येक माणसाला फक्त माणूस असल्यामुळे मिळतात. शिक्षण घेण्याचा हक्क, मुक्तपणे श्वास घेण्याचा हक्क, सुरक्षित वातावरणात जगण्याचा हक्क, आपले मत मोकळेपणे व्यक्त करण्याचा हक्क, मुलांना, मुलींना, श्रीमंतांना, गरिबांना, सगळ्यांना समान वागणूक मिळण्याचा हक्क, चांगले आरोग्य, अन्न, पाणी यांचा हक्क… हे हक्क नसते तर आपले जीवन खूप कठीण झाले असते. म्हणूनच मानवी हक्क आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत.
१० डिसेंबर १९४८ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाने मानवी हक्कांचा जाहीरनामा स्वीकारला. हा दिवस म्हणजे माणसाचा सन्मान, समानता, स्वातंत्र्य आणि न्याय यांना दिलेला मानाचा सलाम. तुमच्या भावना, मत व्यक्त करण्याचा हक्क हा तुमचा हक्क. मानवी हक्कांचे पालन घरापासून, शाळेतून, मित्रांमधूनच सुरू होते. कोणाबाबत भेदभाव करू नये. जात, धर्म, भाषा, पोशाख यावरून फरक करू नये. मित्रांचे प्रश्न मनापासून ऐकावेत. ज्याला मदतीची गरज आहे, त्याला मदत करावी. कुणी एखाद्यावर अन्याय करत असेल तर त्याला विरोध करावा. सर्वांसोबत प्रेमाने, आदराने आणि समजुतीने वागावे. असे केल्याने आपण खऱ्या अर्थाने मानवी हक्कांचे मूल्य पाळतो.
आजचा दिवस आपल्याला काय शिकवतो. जागतिक मानवी हक्क दिन हा फक्त एक कार्यक्रम किंवा भाषणांचा दिवस नाही. हा दिवस आपल्याला सांगतो, की प्रत्येक माणूस महत्त्वाचा आहे. कुणाचाही अपमान करू नये. प्रत्येकाला सुरक्षित आणि आनंदी जीवनाचा हक्क आहे. जे स्वतःसाठी योग्य वाटते, तेच इतरांसाठीही योग्य मानावे.
आपण सगळे मिळून ठरवू या, की कोणताही माणूस त्याचे हक्क मिळण्यापासून दूर राहणार नाही. आपण स्वतः हक्कांचा आदर करू आणि इतरांनाही तेच शिकवू. कारण जगात शांतता, प्रेम आणि समानता फक्त तेव्हाच येते, जेव्हा प्रत्येक माणसाचा सन्मान केला जातो.

अक्षय लंबे

🔗

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *