भारतीय नौदल दिन

१९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात ‘ऑपरेशन ट्रायडंट’मध्ये भारतीय नौदलाने मिळवलेल्या विजयाची आठवण म्हणून भारतीय नौदल दिन दर वर्षी चार डिसेंबर रोजी साजरा केला जातो. त्याविषयी थोडक्यात माहिती…
……
‘शं नो वरुणः’ हे आपल्या भारतीय नौदलाचे हे ब्रीदवाक्य आहे. ‘वरुण देव आमच्यासाठी शुभ होवो’ असा त्याचा अर्थ. आपली भारतीय सेना देशाच्या सर्वच सीमांचे अगदी चोख रक्षण करत आहे. समुद्री सीमांचे रक्षण करणे ही नौदलाची जबाबदारी आहे. चार डिसेंबरला भारतीय नौदल दिन साजरा केला जातो. या दिवशी नौदलाच्या पराक्रमाची आणि देशाच्या सागरी सुरक्षेसाठी असलेल्या योगदानाची ओळख करून दिली जाते. ऑपरेशन ट्रायडंटमध्ये भारतीय नौदलाने कराची बंदरावर हल्ला करून पाकिस्तानची चार जहाजे बुडवली होती. काय होते हे ‘ऑपरेशन ट्रायडंट’? १९७१च्या भारत-पाकिस्तान युद्धामध्ये भारतीय नौदलाने पाकिस्तानच्या कराची बंदरावर केलेल्या हल्ल्याचे हे नाव होते.

बांगलादेश स्वतंत्र होण्यात भारतीय नौदलाने महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यानंतर तीन डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तानने भारताच्या हवाई तळांवर बॉम्बफेक केली आणि युद्धाला तोंड फुटले. त्यानंतर ४-५ डिसेंबर १९७१च्या रात्री भारताने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यात भारतीय नौदलाने जहाजविरोधी क्षेपणास्त्रांचा वापर केला आणि पाकिस्तानी नौदलाची चार जहाजे बुडवली. तसेच कराचीमधील इंधनसाठाही नष्ट केला. त्यात पीएनएस खैबर आणि पीएनएस मुहाफिज यांचा समावेश होता. या हल्ल्यामुळे कराची बंदरातील इंधनसाठा पूर्णपणे नष्ट झाला. या हल्ल्यात अनेक पाकिस्तानी सैनिक ठार झाले आणि शेकडो जखमी झाले. या ऑपरेशनमध्ये भारतीय नौदलाचे कोणतेही नुकसान झाले नाही. जहाजविरोधी क्षेपणास्त्रांचा वापर असलेले हे पहिले यशस्वी ऑपरेशन होते.
दर वर्षी या दिवशी मुंबईतील वेस्टर्न नेव्हल कमांड आणि विशाखापट्टणममधील इस्टर्न नेव्हल कमांड येथे विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यात नौदलाची जहाजे आणि खलाशी सहभागी होतात. या दिवशी नौदलाच्या विविध आधुनिकीकरण मोहिमा आणि भविष्यातील योजनांची माहितीदेखील दिली जाते. भारतीय नौदलाचा नवीन लोगो छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेतून प्रेरणा घेऊन करण्यात आलेला आहे. देशाच्या सागरी सीमा आणि सागरी हितसंबंधांचे रक्षण करणे, शांतता आणि युद्धकाळात संरक्षण करणे, नैसर्गिक आपत्तीमध्ये मदत करणे, इतर देशांशी द्विपक्षीय संबंध सुधारणे आणि वृद्धिंगत करणे अशी कार्ये भारतीय नौदल समर्थपणे पार पाडते. भारतीय नौदलाला आणि त्यातील पराक्रमी वीरांना शतश: नमन!!

(संकलित माहिती)

🔗

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *