अमृत कौशल्य कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अकोला कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंसोबत बैठक

अकोला : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेल्या ‘अमृत’ या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेकडून कौशल्यवृद्धीसाठी अमृत कौशल्य हा कार्यक्रम राबवला जात आहे. त्याच्या प्रभावी अंमलबजावणीच्या दृष्टीने चर्चा करण्यासाठी ‘अमृत’चे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी आणि अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांची नुकतीच बैठक झाली.

महाराष्ट्र संशोधन, उन्नती आणि प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात ‘अमृत’ या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात १२ डिसेंबर रोजी त्यांनी अकोला जिल्हा कार्यालयाला भेट दिली आणि अकोल्यामध्ये कार्यरत असलेल्या अमृत संस्थेच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली.

या बैठकीत अमृत महाराष्ट्र आणि अमृत कौशल्य या योजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. अमृत कौशल्य कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पंजाबराव कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, तसेच संबंधित इन्स्टिट्यूटमधील तज्ज्ञांची स्वतंत्र बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी तज्ज्ञांशी संवाद साधून प्रशिक्षणाची गुणवत्ता, अभ्यासक्रम व भविष्यातील संधी या विषयांबाबत सखोल चर्चा करण्यात आली.

अमृत संस्थेच्या विविध योजनांतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या लाभार्थ्यांशी आणि अकोला जिल्ह्यातील विविध संस्थांच्या प्रमुखांशी संवाद साधण्यात आला. लाभार्थ्यांना येणाऱ्या अडचणी, त्यांचे अनुभव आणि प्रत्यक्ष क्षेत्रातील समस्यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

व्यवसायवाढ आणि स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी कोणते उपक्रम राबवता येतील, याबाबत विजय जोशी यांनी विविध नावीन्यपूर्ण कल्पना मांडल्या. लाभार्थ्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी अमृत संस्थेमार्फत ठोस उपाययोजना कशा करता येतील, याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले.

अमृत संस्थेविषयी :

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/mahaamrut_official/profilecard/?igsh=MW04OHNnamxweXZlbA==
फेसबुक : https://www.facebook.com/share/1CGYUSjznh/?mibextid=qi2Omg

🔗

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *