युनेस्को मुख्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार

मुंबई : महाराष्ट्र शासनाने युनेस्कोच्या मुख्यालयाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा भेट म्हणून दिला होता. या पुतळ्याचे अनावरण युनेस्कोच्या पॅरिसमधील मुख्यालय प्रांगणात झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून हा पुतळा उभा राहिला आहे.

हा क्षण तमाम भारतीयांसाठी अभिमानाचा असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘युनेस्को’शी संबंधित सर्व पदाधिकारी, वरिष्ठ अधिकारी यांचे आभार मानले आहेत. ते म्हणतात, ‘महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या विद्वत्तेने आणि प्रतिभेने जगाला समता-बंधुता आणि सामाजिक परिवर्तनाची दिशा दिली. भारताला मिळालेले संविधान हे त्यांच्या उत्तुंग अशा कर्तृत्वाचा आविष्कार आहे. अशा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे संविधान दिनी अनावरण म्हणजे जगातील सर्वांत मोठ्या लोकशाही राष्ट्राला मिळालेल्या संविधानप्रति व्यक्त झालेला परमोच्च आदराचा क्षण आहे. आम्ही हा क्षण महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रति अभिवादनाची संधी मानतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हा पुतळा उभा रहावा, यासाठी प्रयत्नशील असलेल्या सर्वांचे अभिनंदनही करतो. या निमित्ताने सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो.’

युनेस्कोच्या मुख्यालयात युनेस्कोचे महासंचालक खालिद अल-इनाय यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण झाले. या वेळी भारताचे युनेस्कोतील स्थायी प्रतिनिधी विशाल शर्मा यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाने यापूर्वीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडन येथील घर खरेदी करून त्याचे संग्रहालयात रूपांतरण केले आहे. जपानमधील कोयासान विद्यापीठातही डॉ. बाबासाहेबांचा पुतळा उभा राहिला आहे. आता मुंबईतील इंदूमिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या कामालाही वेग देण्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी वेळोवेळी निर्देश दिले आहेत.
(स्रोत : महासंवाद)

🔗

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *