वसंत सबनीस

प्रसिद्ध लेखक, पटकथाकार आणि साहित्यिक वसंत सबनीस यांचा सहा डिसेंबर हा जन्मदिन. त्या निमित्ताने, त्यांचा अल्प परिचय…

…….
रघुनाथ दामोदर सबनीस ऊर्फ वसंत सबनीस यांचा जन्म ६ डिसेंबर १९२३ रोजी सोलापुरात झाला. पुण्यातल्या वास्तव्यात पु. ल. देशपांडे, राम गबाले, शरद तळवलकर यांच्याशी झालेली घट्ट मैत्री त्यांच्या एकूण व्यक्तिमत्त्वाच्या घडणीतच महत्त्वाची ठरली. जीवनाकडे खट्याळपणे बघणे, प्रतिकूलतेतही चेहऱ्यावरचे हसू कायम ठेवणे आणि इतरांच्या जगण्याकडे आस्थेने बघणे, या गोष्टी मित्रांप्रमाणे त्यांच्यातही आल्या.
सबनीस यांचे व्यक्तिमत्त्व बहुपैलू होते. ते ग्रामीण बाजाचे लेखन उत्तम प्रकारे करत. तसेच एकांकिका, रहस्यकथाही लिहीत. १९९३ साली मुंबईत झालेल्या नाट्यसंमेलनाचे ते अध्यक्ष होते. ‘घरोघरी हीच बोंब, ‘कार्टी श्रीदेवी’ या नाटकांबरोबरच, ‘विच्छा माझी पुरी करा’सारख्या अप्रतिम नाटकांपासून ‘सोंगाड्या,’ ‘एकटा जीव सदाशिव’ असे गाजलेले चित्रपट दादा कोंडके यांच्यासाठी त्यांनी दिले. व्यावसायिक रंगभूमी आणि चित्रपटांमध्ये एक प्रतिष्ठित विनोद रुजवण्याचा सबनीसांनी केलेला प्रयत्न बराचसा यशस्वी झाला. त्यांच्या अनेक कथांना राज्य सरकारचे वाङ्मय पुरस्कार मिळाले आहेत. नाटककार राम गणेश गडकरी पुरस्कारही त्यांना मिळाला आहे.
त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे, प्रत्येक वेळी त्यांनी निर्माण केलेली कलाकृती ट्रेडसेंटर ठरली. ‘गेला माधव कुणीकडे’सारखे तब्बल १० वर्षे मराठी रंगभूमीवर हाउसफुल असलेले नाटक, ‘अशी ही बनवाबनवी,’ ‘गंमत जंमत’सारखे चित्रपट त्यांची ही खासियत अधोरेखित करतात. ‘सबनिशी’ हा त्यांचा विनोदी लेखसंग्रह, ‘थापाड्या’, ‘पखाल’ हे विनोदी कथासंग्रह, तर ‘माझेश्वरी’ हे बऱ्या-वाईट अनुभवांचे संकलन प्रसिद्ध झाले आहे. ग्रामीण आणि शहरी संस्कृतींमध्ये तितक्याच सहजतेने वावरणाऱ्या सबनीसांना लोककलांबद्दल विशेष प्रेम होते. ‘किशोर’ मासिकाच्या संपादनामुळे पुढील पिढ्यांना सबनीसांबद्दल कृतज्ञता वाटत राहील. १५ ऑक्टोबर २००२ रोजी मुंबईत त्यांचे निधन झाले. अशा चतुरस्र लेखणीच्या या साहित्यिकाला शतश: नमन!

(माहिती स्रोत-मराठी वर्ल्ड)

🔗

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *