६४ घरांचा राजा – विश्वनाथन आनंद

जगप्रसिद्ध बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांचा ११ डिसेंबर हा जन्मदिन. त्या निमित्ताने…
…..
विश्वनाथन आनंद हे जगप्रसिद्ध बुद्धिबळपटू. त्यांना ‘विशी’ या नावानेदेखील ओळखले जाते. शांत, हुशार आणि बुद्धिबळाच्या पटावर अधिराज्य गाजवणारा हा खेळाडू म्हणजे आपल्या भारताचा खरा अभिमान आहे. विश्वनाथन आनंद यांचा जन्म ११ डिसेंबर १९६९ रोजी तमिळनाडूत मायिलादुथुराई इथे झाला. लहानपणापासूनच ते खूप हुशार आणि अभ्यासू वृत्तीचे होते. वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी त्यांनी बुद्धिबळ शिकायला सुरुवात केली. याची सुरुवात घरातूनच झाली आणि पुढे ते जगज्जेते झाले. या बुद्धिबळाच्या खेळात आईच त्यांची पहिली गुरू होती.

विश्वनाथन आनंद यांच्या खेळाची एक वेगळी गोष्ट म्हणजे त्यांची विचार करण्याची पद्धत. कोणती चाल कधी खेळायची, कशी त्या चालीवर मात करायची, याचा त्यांना आधीच अंदाज यायचा. त्यामुळे ते वेगाने चाली खेळायचे. म्हणूनच त्यांना ‘लाइटनिंग किड’ या नावाने संबोधले जायचे. विश्वनाथन आनंद यांनी जगातील दिग्गज खेळाडूंना हरवून पाच वेळा विश्वविजेतेपद जिंकले आहे. १९८८मध्ये ते ग्रँडमास्टर झाले. ही कामगिरी करणारे ते भारतातील पहिलेच खेळाडू. त्यांच्या या यशामुळे भारतात बुद्धिबळ खेळाला नवी उंची मिळाली. खेळाची लोकप्रियताही वाढली. याच खेळातील कामगिरीमुळे विश्वनाथन आनंद यांना अर्जुन पुरस्कार, राजीव गांधी खेलरत्न, पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण असे पुरस्कार मिळाले.

विश्वनाथन आनंद हे उत्तम खेळाडू तर आहेतच; पण आता देशाच्या नव्या पिढीच्या बुद्धिबळपटूंना ते मार्गदर्शनही करतात. अनेक मुलांनी आणि तरुणांनी त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली आहे. विश्वनाथन आनंद हे मेहनत, शांतता आणि यश मिळवण्यासाठी लागणारी एकाग्रता याचे एक चांगले उदाहरण आहेत. त्यांच्या कामगिरीमुळे भारताचे नाव जगभर उजळून निघाले आहे. यश मिळवायचे असेल तर आपण कष्ट करायला हवेत, काम करतेना मन शांत ठेवणे आणि स्वतःवर पूर्ण संयम राखणे, या गोष्टी अवलंबायला हव्यात. याचे पालन केले तर यश नक्की मिळते, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे विश्वनाथन आनंद!

(संकलित माहिती)

🔗

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *