माती आपल्याला जगवते, आपण तिला जगवू या!

पाच डिसेंबरच्या जागतिक मृदा दिनानिमित्त….
……

माटी कहे कुम्हार से, तू क्या रौंदे मोहे
एक दिन ऐसा आएगा, मैं रौंदूंगी तोहे!!

संत कबीरांचा हा दोहा आपल्याला मातीचे महत्त्व सांगतो. आपण कितीही पुढारलो, आधुनिक झालो, तरी आपण आपल्या मुळांना, आपले अस्तित्व निर्माण करणाऱ्या तत्त्वांना विसरता कामा नये. त्यातील एक महत्त्वाचे म्हणजे माती अर्थात मृदा. आपला जन्म कोठेही होवो, परंतु मृत्यूनंतर आपले अस्तित्व मातीत मिसळून जाणार आहे, असेच कबीर सांगतात.

याच मातीचे महत्त्व आपण विसरू नये म्हणून दर वर्षी पाच डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिन ( World Soil Day ) साजरा केला जातो. हा दिवस निरोगी मातीचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि माती संवर्धनासाठी शाश्वत व्यवस्थापनाची गरज अधोरेखित करण्यासाठी समर्पित केलेला आहे. या दिवसाचे उद्दिष्ट मातीची धूप आणि ऱ्हास यांसारख्या गंभीर पर्यावरणीय समस्यांबद्दल जागरूकता निर्माण करणे हा आहे. २०१३मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने पाच डिसेंबर हा जागतिक मृदा दिन म्हणून अधिकृतपणे घोषित केला. दर वर्षी या दिवसाची एक विशिष्ट थीम अर्थात संकल्पना असते. २०२५चा मृदा दिन ‘निरोगी शहरांसाठी निरोगी माती’ या संकल्पनेवर आधारित आहे. शहरी भागातील मातीचे महत्त्व पटवण्यासाठीही संकल्पना घेण्यात आली आहे.
या निमित्ताने आपण मातीविषयी काही रंजक, परंतु महत्त्वाच्या बाबी जाणून घेऊ या.

  • माती ही अतिशय महत्त्वपूर्ण आणि जटिलता असणारी परिसंस्था आहे.
  • जगात सर्व सजीवांना जगण्यासाठी जे काही अन्न व इतर जीवनावश्यक गोष्टी लागतात, त्यातील ९८ टक्क्यांपेक्षा जास्त गरज मातीच पुरवते.
  • माती हे खडक, पाणी, खनिजे, हवा आणि सेंद्रिय पदार्थांचे मिश्रण आहे.
  • एक ग्रॅम निरोगी मातीत हजारो प्रजातींचे जिवाणू आणि शेकडो प्रजातींच्या बुरशी असू शकतात.
  • गांडूळ किंवा तत्सम प्राणी आणि कीटकांसाठी माती हा नैसर्गिक अधिवास आहे.
  • मातीचा फक्त दोन ते तीन सेंटिमीटर जाडीचा थर तयार होण्यासाठी एक हजार वर्षे लागू शकतात.
  • अन्न उत्पादनास मदत करणे, औषध पुरवणे, हवामानबदलाचा वातावरणावरील दुष्परिणाम कमी करणे, पाण्याचे नियमन करणे अशी अनेक कार्ये माती करते.
  • अशा महत्त्वपूर्ण मातीचे संवर्धन करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. पृथ्वीचे अस्तित्व टिकवायचे असेल, तर मातीचे प्रदूषण थांबवणे, मातीची धूप रोखणे यांसारखे उपाय करावेच लागणार आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाने दिलेल्या इशाऱ्यानुसार सद्यस्थितीत पृथ्वीवरच्या एकूण मृदा क्षेत्रापैकी ४० टक्के मृदा अत्यंत खराब अवस्थेत आहे. २०५०मध्ये अन्नधान्याची जागतिक मागणी पूर्ण करण्यासाठी कृषी उत्पादनात ६० टक्के वाढ करावी लागेल. म्हणूनच आपण सर्वांनी मृदासंवर्धनासाठी पुढे येऊन आपापल्या परीने मातीचे संरक्षण करण्याची अत्यंत गरज आहे. या दिवसाच्या निमित्ताने मृदासंवर्धनाचा संकल्प करू या!

(संकलित माहिती)

🔗

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *