झोंपाळ्यावरची गीता : बालसुलभ मराठीतून गीतेचं सौंदर्य उलगडणारं शतकापूर्वीचं पुस्तक

मार्गशीर्ष शुक्ल एकादशी अर्थात मोक्षदा एकादशी या दिवशी गीता जयंती साजरी केली जाते. सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी याच दिवशी श्रीकृष्णाने अर्जुनाला श्रीमद्भगवद्गीता सांगितली आणि ज्ञान देऊन मोक्षाचा मार्ग दाखवला, असं मानलं जातं. त्यामुळेच हा दिवस गीता जयंती म्हणून साजरा केला जातो; मात्र एकादशी हा भगवंताचा आवडीचा दिवस आणि मार्गशीर्ष हा आवडीचा महिना. त्यामुळे त्या अनुषंगाने मार्गशीर्ष एकादशीला गीता जयंती साजरी केली जाते, असंही म्हटलं जातं. श्रीमद्भगवद्गीता हा मानवी जीवनाचं सार सांगितलेला महान ग्रंथ आहे, हे आपल्याला माहिती आहेच. झोंपाळ्यावरची गीता ही १००हून अधिक वर्षांपूर्वी कवी अनंततनय यांनी बालसुलभ मराठीत केलेली रचना आहे.

मानवी जीवनाचं सार सांगितलेला श्रीमद्भगवद्गीता हा महान ग्रंथ जाणून घ्यायचे, अभ्यासायचे प्रयत्न युगानुयुगे सुरू आहेत; मात्र प्रत्येक वेळी गीता वाचताना, अभ्यासताना त्यातील नवे अर्थ, त्याचे वैविध्यपूर्ण पैलू, पूर्वी न कळलेले आयाम समोर येतात, असं अभ्यासकांचं म्हणणं आहे. संस्कृत अर्थात गीर्वाणवाणीतलं हे ज्ञान सर्वांना उमजावं, याकरिता विनोबांनी सुगम मराठीत गीताईची रचना केली आणि ती घराघरात पोहोचली; मात्र गीतेतलं तत्त्वज्ञान त्याआधीही अत्यंत सोप्या मराठी भाषेत मांडलं होतं ते दत्तात्रेय अनंत आपटे अर्थात अनंततनय यांनी. त्यांनी इसवी सन १९१७मध्ये ‘झोंपाळ्यावरची गीता’ ही रचना केली होती.

पूर्वी मुलींची लग्नं वयाच्या दहाव्या-बाराव्या वर्षी होत. चैत्रगौरीच्या निमित्ताने त्या माहेरी येत, त्या वेळी झाडांना किंवा अंगणात झुले (झोपाळे) बांधून त्यावर त्यांचे खेळ चालत. त्या वेळी वेगवेगळी गाणी म्हटली जात. त्याबरोबरच या मुलींनी गीता म्हटली तर लहान वयात त्यांना चांगलं ज्ञान मिळू शकेल, तसंच त्या मुली त्यांच्या पुढच्या पिढीवर ते संस्कार करू शकतील, असा विचार पुढे आला; पण संस्कृतातली गीता म्हणणं तसं अवघड होतं. त्यामुळे गीतेची अत्यंत सोप्या भाषेत रचना करून त्या रचनेला ‘झोंपाळ्यावरची गीता’ असं नाव दिलं गेलं.

अनिकेत कोनकर यांना त्यांचे मातुल आजोबा कै. बा. के. करंबेळकर गुरुजी यांच्या संग्रहात २०१०मध्ये ‘झोंपाळ्यावरची गीता’ ही दुर्मीळ पुस्तिका सापडली. त्यातली लेखकाच्या नावासह काही पानं गहाळ झालेली होती. वृत्तपत्रात लेख, स्वतंत्र वेबसाइटनिर्मिती आदी माध्यमांतून लोकांना आवाहन करून ती गहाळ पानं शोधण्यात त्यांना यश आलं. त्यामुळे अनंततनय यांनी ती रचना केल्याचं समजलं. (दिवंगत) बालसाहित्यकार सरिता पदकी यांनी त्यांच्या संग्रहातून ती गहाळ पानं उपलब्ध करून दिली. त्यानंतर ती गीता वेबसाइटवर उपलब्ध करण्यात आली. एक ऑगस्ट २०१५ रोजी रत्नागिरीच्या सत्त्वश्री प्रकाशनातर्फे (कोकण मीडिया) ‘झोंपाळ्यावरची गीता’ पुस्तकरूपानं प्रकाशित करण्यात आली.

त्यापुढचा टप्पा म्हणून २०२०-२१ मध्ये झोपाळ्यावरच्या गीतेचा इंग्रजी अनुवाद करण्यात आला. मराठीसह इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असलेले रत्नागिरीतले व्यासंगी पत्रकार, ज्येष्ठ लेखक राजेंद्रप्रसाद मसुरकर यांना भेट दिलेली झोंपाळ्यावरच्या गीतेची प्रत वाचल्यानंतर तिचा इंग्रजीत अनुवाद करावा, असं प्रकर्षानं वाटलं. त्या इच्छेतून तो समश्लोकी इंग्रजी अनुवाद साकारला. तो अनुवाद The Geeta in Leisure या नावाने सत्त्वश्री प्रकाशनानेच २०२२मध्ये प्रकाशित केला.

अनंततनय यांनी केलेली झोपाळ्यावरच्या गीतेची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. तिला गेयता तर आहेच; पण भाषा सोपी असली, तर कमी शब्दांत बराच अर्थ सांगणारी आहे. विनोबांची गीताई हा श्रीमद्भगवद्गीतेचा समश्लोकी अनुवाद आहे. झोंपाळ्यावरची गीता मात्र समश्लोकी नाही. त्यातल्या अध्यायांची श्लोकसंख्या मूळ संस्कृत श्लोकांपेक्षा काही ठिकाणी कमी, तर काही ठिकाणी जास्त आहे. गीतेत ७००, तर झोंपाळ्यावरच्या गीतेत ५४६ श्लोक आहेत. मराठी भाषेचं सौंदर्य वेगळ्या पद्धतीनं यातून प्रतीत झालं आहे.

गीतेचं आध्यात्मिक महत्त्व तर अद्वितीय आहेत; मात्र भाषेचं सौंदर्य अभ्यासण्यासाठीही ही गीता उपयुक्त ठरते. कारण मूळ संस्कृत ग्रंथाचा बालसुलभ मराठीत केलेला अनुवाद आणि त्या मराठी अनुवादाचा इंग्रजीतील समश्लोकी अनुवाद अशी त्याची रूपांतरं झाली आहेत. त्यामुळे अध्यात्मासारखा गहन विषय सोप्या भाषेत कसा मांडता येऊ शकतो, याचा वस्तुपाठ देणारं हे पुस्तक आहे, शब्दसंग्रहात भर घालणारं आहे. शिवाय, आताच्या काळात इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण जास्त असल्याने हा ठेवा इंग्रजीत उपलब्ध झाल्याने त्यांच्यासाठीही ज्ञानाचं भांडार खुलं झालं आहे.

– अनिकेत कोनकर

🔗

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *